पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/146

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 नायकाच्या अलौकिकत्वाविषयी गाढ श्रद्धा नसेल तर मग तो प्रयत्नच अयशस्वी होतो. गाढ श्रद्धाभाव असेल तर मग माणसाकडे माणूस म्हणून पाहणेच कठीण होऊन जाते. आदर असणे आणि नसणे या दोहोंचाही अडथळा होतो. या वातावरणात असामान्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा शोध कलावंतांना घ्यावा लागतो. ही जिद्द कानेटकरांनी धरली हयात इतर सर्व नाटककारांच्यापेक्षा त्यांचे निराळेपण आहे. या जिद्दीला एक महत्त्वपूर्ण यश 'हिमालयाची सावली' या नाटकात आले आहे. हा या धडपडीचा एक महत्त्वाचा विजयी असा टप्पा आहे.
  मूळ नाटकाच्याकडे वळण्यापूर्वी इतर किरकोळ अशा, मला महत्त्वाच्या वाटणाऱ्या, परंतु इतरांना कदाचित अवांतर वाटणाऱ्या बाबींचा उल्लेख मी आधीच करून टाकतो. या बाबी वाङ्मयचर्चेत अप्रस्तूत आहेत ह्याची मला जाणीव आहे, पण वाङ्मयाविषयीची चर्चा संपूर्णपणे वाङ्मयांतर्गत अशी कधीच नसते. केवळ कलाकृतीला अंतर्गत असणाऱ्या प्रश्नांचीच काटेकोरपणे चर्चा करायची म्हटली तर त्या वाङ्मयप्रकारात एखाद्या साहित्यकृतीचे स्थान सांगणेसुद्धा अशक्य होऊन जाईल. वाङ्मयीन व्यवहार हा इतका कलाकृतीशी तादात्म्य पावणारा असू शकत नाही. ज्या व्यक्तिमनातून कलाकृती सिद्ध होते ते व्यक्तिमन कलाकृतीच्या बाहेर असते. ज्या सामाजिक जाणीवप्रवाहात कलाकृतीचा आस्वाद अस्तित्वात येतो, त्या जाणिवा कलाकृतीच्या बाहेर असतात. ज्या वाङ्मयप्रकाराच्या संदर्भात एका विशिष्ट कृतीची चर्चा केली जाते तेही या साहित्यकृतीच्या बाहेर असते. वाङ्मयाची चर्चा वाङ्मयव्यवहाराला अंतर्गत असावी ही अपेक्षा स्थूलमानानेच गृहित धरावी लागते. तिचा अर्थ जर आपण काटेकोरपणे करू लागलो तर वाङ्मयीन समीक्षा आणि आस्वाद दोन्ही अशक्य होऊन जातात. जे आपण वाङ्मयबाह्य मानतो ते काही अंशाने वाङ्मयबाह्य असले तरी सर्वार्थाने वाङ्मयबाह्य नसते हे व्यवहारात आपण समजून घेतो आणि तात्त्विक चर्चेत नाकारतो. सगळे मानवी जीवनच ज्या अनेकविध विसंगतीने भरले आहे तिच्यापैकीच ही एक विसंगती म्हटली पाहिजे.

बयोसाठी वापरलेली भाषा
  'हिमालयाची सावली' या नाटकात बयोच्यासाठी वापरलेली भाषा हा ह्या नाटकाचा एक महत्त्वाचा भाग आहे. एखाद्या साहित्यकृतीचा विचार करताना

रं....१०
हिमालयाची सावली / १४५