पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/145

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 आदरभावनेने आपण केवळ पूजक होत नाही हे दाखवण्यासाठीच की काय जणू दोघांच्याही वाङ्मयात काही प्रसंग आलेले आहेत. रणजित देसाईंच्या 'श्रीमान योगी'त छत्रपतींच्या जीवनातील शृंगाराचे प्रसंगही येतात. शिवाजीने संतापाने मोऱ्यांची मुले मारली व पुढे त्याला पश्चाताप झाला. असे आततायी कृत्य घडल्याचाही उल्लेख येतो. पुरंदरचा तह घडून आल्यानंतर हताश, उद्विग्न असा शिवाजी आत्महत्येपर्यंत गेला होता हेही ते दाखवतात. ही यादी अजून वाढवता येईल. 'इथे ओशाळला मृत्यू' या नाटकात संभाजीला सतत आपण अपयशी आहोत, आपली पापे आपल्याला छळत आहेत अशी जाणीव दाखवलेली आहे. प्रत्यक्ष शिवाजी महाराजसुद्धा 'रायगडाला जेव्हा जाग येते' या नाटकात संभाजी दिलेरखानाला जाऊन मिळाल्याबरोबर ती बातमी ऐकताच खचून जातात तेव्हा हाच प्रकार घडतो. कानेटकरांच्या नाटकांतून असे अनेक प्रसंग क्रमाने दाखवता येतील, पण त्याची गरज नाही. हे असे प्रसंग का येतात हा महत्त्वाचा प्रश्न आहे. या प्रसंगाच्या रूपाने हे कलावंत जणू आपण व्यक्तीच्या भक्तिभावनेने भारावलेले नसून त्याच्यातील माणूस दाखविण्याइतके आपण शुद्धीवर आहो असेच आपल्या वाचकांना सुचवीत असतात आणि हा सगळा प्रयत्न कुठेतरी सांधा निसटल्यासारखा वाटू लागतो.

लेखकापुढील कोडे
  श्रीमान योगी' हा असामान्यांच्या जीवनाच्या आकलनाचा कादंबरी क्षेत्रात एक महत्त्वाचा प्रयत्न आहे, असेच मी मानतो. छत्रपतींच्या जीवनाचे जास्तीत जास्त चांगले व नीटस आकलन मराठी कादंबरीच्या संदर्भात ह्या कादंबरीत आले आहे असे मला वाटते आणि तरीही ते फार अपुरे पडले आहे. 'रायगडाला जेव्हा जाग येते' या नाटकाविषयी असेच म्हणता येईल. मराठी ऐतिहासिक नाटकात छत्रपतींच्या व्यक्तिमत्त्वाचा शोध घेण्याचा हा पहिलाच प्रयत्न होता.मागच्या सर्व प्रयासाच्या मानाने इथे कानेटकर कितीतरी पुढे गेलेले आहेत. नाट्यक्षेत्रात इतर कुणाच्या शिवाजीशी त्यांच्या शिवाजीची तुलना करण्याचा प्रश्नच संभवत नाही आणि तरीही हा प्रयत्न अपुरा पडलेला आहे. असामान्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या शोधाला भक्तिभाव अपुराच पडणार, याला इलाज नाही.

१४४/ रंगविमर्श