पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/144

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

असामान्यांच्या व्यक्तित्वाचा शोध असे म्हणता येणार नाही. फार तर समाज ज्यांना असामान्य म्हणतो, पण कलावंतांना ज्या असामान्य वाटत नाहीत त्या व्यक्तीचा कलावंताने केलेला हा मूर्तिभंग असतो. असामान्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा शोध मूर्तिभंजनापेक्षा निराळा असतो.
 समाजाने ज्यांना अलौकिक आणि असामान्य विभूती म्हणून मान्यता दिलेली असते, कलावंतांनाही त्या विभूती अलौकिक आणि असामान्य वाटतच असतात. या उभयतांच्या संवादी जाणिवांच्यानंतर खऱ्या अलौकिकाचा शोध सुरू होतो. या शोधाच्या ठिकाणी प्रत्यक्ष कलावंताच्या मनात असणारा उत्कट भक्तिभाव हाच एक अडथळा असतो. कारण या भक्तिभावामुळे पूज्य दैवते माणूस म्हणून पाहणेच अशक्य होऊन जाते. असामान्यांच्या जीवनाचा शोध घेता घेता वेळोवेळी कानेटकरांना अपयश आले असले तर त्याचे कारण हे आहे. कानेटकरांच्या या अपयशात कादंबरीच्या क्षेत्रात रणजित देसाई हे महत्त्वाचे सहयात्री आहेत.

लेखकांच्या मनात नायकाबद्दल असणारा पूज्यभाव हा अडथळा
 नाटकांमध्ये 'रायगडाला जेव्हा जाग येते', 'इथे ओशाळला मृत्यू', 'तुझा तू वाढवी राजा' या नाटकांच्यामधून, कादंबऱ्यांमध्ये 'स्वामी', 'श्रीमान योगी' या कादंबऱ्यांमधून जे घडते आहे ते हे आहे. या नायकांच्याविषयी समाजात असणारा अतीव आदरभाव हा खरा अडथळा नाही. खरा अडथळा लेखकांच्या मनातच या नायकांविषयी अत्यंत पूज्यबुद्धी आहे. या नायकांच्याविषयी व्यक्तिशः माझ्याही मनात सर्वांच्याप्रमाणे आदरभाव आहे, पण समाजदैवतांविषयी आदरभाव असणे ही कितीही चांगली गोष्ट असली तरी असामान्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा शोध म्हणजे त्यांची पूजा नव्हे. शिवाजी, संभाजी तर सोडाच, पण भीष्माच्याबाबतसुद्धा कानेटकरांना हा आदरभाव जाणवतो. व्यक्तिशः कानेटकरांनी या आदरभावाचा विचार कधी केला होता की नाही हे मला सांगता येणार नाही. तसा त्यांचा माझा कोणताच खाजगी परिचय नाही, पण रणजित देसाईंच्या बाबत मी हे सांगू शकतो की, त्यांनी या आदरभावनेच्या मुद्द्याचा अतिशय गंभीरपणे विचार केला असावा असे त्यांच्या वाङ्मयावरून दिसते.{{centerहिमालयाची सावली / १४३}}