पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/143

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

असामान्यांचे पराभव
 ज्यांना समाज असामान्य मानतो, ज्यांच्या जीवनात प्रकृतीने संस्कृतीच्या समोर पत्करलेला पराभव सर्व व्यथा-भोगांच्यानिशी साकार झालेला असतो, ते स्वतःचेच अस्तित्व नष्ट करीत समाजाच्या स्वार्थात स्वतःला विलीन करण्याच्या जिद्दीने पेटून उठलेले असतात तेही विकृत असतात, पण अतीव आजाराच्या पोटी समाज त्यांना अलौकिक मानतो, कारण ते समाजाच्या स्वार्थाचे संरक्षक असतात. या विकृतांना असामान्य मानण्याची प्रथा आहे. तेही जीवनाचा भाग आहेत, पण सातत्याने त्यांच्या व्यक्तित्वाचा शोध घेण्याची जिद्द धरणारा कलावंत मराठीत नाही. अतिशय तुरळकपणे मराठीत हा प्रयत्न होतो. हा प्रयत्न करणाऱ्यांत वसंत कानेटकर हे अग्रभागी आहेत. म्हणून या नाटककाराविषयी, त्याच्या अपयशाविषयीसुद्धा मला फार मोठी जिज्ञासा आहे.

मूर्तिभंजन नव्हे
  असामान्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा शोध ही सरळ बाब असूच शकत नाही. या असामान्यांच्याविषयी समाजमन आदराने भारावलेले असते. या मनाला धक्का देण्याची हिम्मत दाखवणे फारसे कठीण नाही. त्यासाठी व्यक्तिगत बेडरपणा पुरे होतो. पण हा धक्का बसल्यानंतर एक कलाकृती म्हणून आस्वाद अशक्य होतो. ऐतिहासिक व्यक्तीच्या विडंबनावर आधारलेल्या साहित्यकृती काही जणांच्या द्वेष-मत्सराचा विषय होतात, तर उरलेल्या अनेकांना अवाङ्मयीन कारणांच्यासाठी त्यांचे आकर्षण वाटू लागते. पैकी चिडणाऱ्यांचा गट दुबळा असला म्हणजे कलावंताच्या स्वातंत्र्याच्या गोष्टी सांगता येतात. चिडणाऱ्यांचा गट बलवान असला म्हणजे मग सामाजिक विभूतींची विटंबना अनुचित कशी आहे याबद्दल मार्गदर्शन करता येते. कलाकृतीचा कलाकृती म्हणून आस्वाद उभय परिस्थितीत अशक्य होतो. असामान्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा शोध हा मूर्तिभंजनासाठी किंवा आदरणीय व्यक्ती हास्यास्पद करण्यासाठी नसतो. खरे म्हणजे अशा वेळी कलावंत आणि समाज यांच्या जाणिवांत विसंवाद आलेला असतो. समाज ज्यांना अलौकिक मानीत असतो त्यांना कलावंत हास्यास्पद आणि तुच्छ समजत असतो. कलावंतांना जे हास्यास्पद आणि तुच्छ वाटतात त्या व्यक्ती त्या साहित्यकृतीपुरत्या हास्यास्पदच असतात. या प्रक्रियेला{{center१४२ / रंगविमर्श}}}