पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/142

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हे माणसाचे माणूसपण म्हणजे माणूस नावाच्या पशूने परिश्रमपूर्वक उभे केलेले आपले सांस्कृतिक संचित असते. या संस्कृतीत केंद्राच्या ठिकाणी मूल्ये उभी असतात. अल्बर्ट कामू विद्रोहाचा विचार करताना विद्रोह नेहमी मूल्यांच्या अनुषंगाने साकार होतो असे सांगतो, याला कारण आहे. कारण विद्रोह नेहमीच सांस्कृतिक असतो. कलांना जर आपण माणसाचा जीवशास्त्रीय व्यवहार न मानता सांस्कृतिक व्यवहार मानणार असू तर मग कलात्मक व्यवहारही मूल्य-सापेक्ष असतो असा निर्णय आपल्याला द्यावा लागतो. मानवी जीवनातील कलात्मक व्यवहार सांस्कृतिक मानावा की जीवशास्त्रीय मानावा, हा या वेळी माझ्यासमोर प्रश्न नसून तूर्तचा प्रश्न इतकाच आहे की माणसाला संस्कृती असते आणि संस्कृतीला मूल्ये असतात. या मूल्यांचा रोख सर्वांच्या कल्याणासाठी, आपल्या सुरक्षिततेचे बलिदान करण्यासाठी असतो. युंगच्या मानसशास्त्रात माणसाच्या या प्रवृत्तीला फार महत्त्वाचे स्थान आहे. एखाद्या सांस्कृतिक मूल्याने माणूस झपाटला जातो आणि तो स्वतःचे सर्व सुख आणि सुरक्षितता यांचे इच्छापूर्वक आपल्याच प्रेरणेने बलिदान करू लागतो त्या वेळीही तो विध्वंसच करीत असतो. फक्त तो सर्वांच्या कल्याणासाठी आपल्या स्वार्थाचा विध्वंस करीत असतो. या माणसाच्या व्यक्तित्वाला प्रेरणा सुप्त मनातून मिळत नाहीत. सुप्त मन पराभूत करून तो समूहाच्या स्वार्थाशी एकरूप होत असतो. हीही विकृतीच आहे. पण ह्या विकृतीविषयी आदर बाळगण्याची माणसाच्या जातीची प्रथा असल्यामुळे ह्या विकृतीला अलौकिकत्व असे म्हणतात.
  सुप्त मनाने ज्यांचे स्वार्थ नियत केलेले आहेत, जे संस्कृतीचा विध्वंस करीतच वागतात तेही असामान्यच असतात, पण त्यांच्याविषयी परंपरेने मानवी समाजात घृणा व तिरस्कार नांदत आला आहे. आधुनिक मानसशास्त्राची ही शिकवण आहे की यांचा तिरस्कार करू नका, हे अनुकंपनीय रुग्ण आहेत. ललित वाङ्मयातील एक प्रभावी प्रवाह यांना समर्थनीय नायक करून सहानुभूतीचा विषय करू इच्छितो, पण समाजात या असामान्यांना विकृत म्हणण्याची प्रथा आहे. या विकृतीचा विकृत अगर अविकृत मनाने शोध घेण्याचा प्रयास मराठीत अनेक कवी, कथाकार, कादंबरीकार, नाटककार घेत आहेत.

हिमालयाची सावली / १४१