पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/141

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

विकृतीचे उदात्तीकरण
  थर्मामीटरने ताप मोजला जातो पण त्यासाठी थर्मामीटरला स्वतःला ताप आलेला नसणे आवश्यक असते. जीवनातील विकृतीचे निकोप आकलन होण्यासाठी कलावंताचे मन अविकृत असावे लागते. कोंडीत सापडलेल्या समाजात तर व्यक्तींच्या विकृतीच्या शेजारी नानाविध हिडीस आकार धारण करणारी सामाजिक विकृतीही असते. कोणत्याही विकृतीचे आकलन वर्ण्य नाही. उलट सर्व विकृतींचे आकलन आवश्यक आहे. अविकृत मनाचे कलावंत जेव्हा विकृतीचे आकलन करतात त्या वेळी रोग्याविषयीची अनुकंपा आणि चिंता असते. असल्या प्रकारची अनुकंपा आणि चिंता या सर्व विकृतींच्या बाबत आपोआपच वाचकांच्या मनात निर्माण होते, पण ज्या वेळी कलावंतच मनाने विकृत असतो त्या वेळी त्याच्या लिखाणात सर्व विकृतींच्या विषयी आकर्षण, समर्थन आणि विकृतीचे उदात्तीकरण या क्रिया घडवताना जाणवतात. हे कितीही दुःखद असले तरी अपरिहार्य असते. कलावंतांना आपल्या विकृतीसुद्धा समाजाच्या समोर मांडण्याचा हक्क असला पाहिजे असे मी मानतो.
  ज्या वेळेला श्रद्धा ठेवण्यासाठी बाहेर काही उरत नाही त्या वेळी माणूस अंतर्मुख होण्याचा प्रयत्न करतो. ज्या वेळी श्रद्धा ठेवण्यासाठी बाहेर काही दिसत नाही, त्या वेळी खरे म्हणजे आतही श्रद्धा ठेवणारे मन शिल्लक राहिलेले नसते. हे श्रद्धाहीन मन जर आपल्याच मनाच्या अंधाऱ्या गुहेत न्याहाळून पाहू लागले तर स्वतःच्याही मनात अनंत वासना-विकृतींच्या जंजाळाखेरीज इतर काही सापडण्याचा संभव नाही. सर्व स्वार्थ आणि सुखोपभोगाच्या इच्छा यांचा निरास झाल्याशिवाय अंतर्मख होण्याचा आदेश धर्मसुद्धा देत नाही. अतृप्त, हताश, विकल आणि विफल व्यक्ती जर अंतर्मुख होऊ लागल्या तर विविध वासनात्मक विकृतींच्या विकट वर्तनाखेरीज इतर कशाचे दर्शन त्यांना होण्याचा संभव नाही, पण हीही एक सामाजिक व्यथा असते. तिलाही आपल्या अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य मिळाले पाहिजे.

माणूसपण- सांस्कृतिक संचित
  विकृतीचा अजून एक दुसरा गट असतो. या विकृतीचा उगम निसर्गात अगर जीवशास्त्रात नसतो. या विकृतीचा उगम माणसाच्या माणूसपणातच आहे.

१४० / रंगविमर्श