पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/140

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अनुसरण करावे ही अपेक्षा असते. कधी ही अपेक्षा पूर्ण होते, कधी ही अपेक्षा पूर्ण होत नाही. समाजाला मार्गदर्शक असणाऱ्या या असामान्य पुरुषांच्या मागे मानवी समाज नेऊन उभा करणे हे कलावंताचे काम आहे असे मी म्हणणार नाही. कारण हे म्हणणे म्हणजे आडवळणाने सर्व मंगल व कल्याणप्रद घटनांच्या प्रचार-प्रसाराला कलावंताने बांधून घेतले पाहिजे असेच म्हणणे आहे. पण हा प्रचार-प्रसाराचा मुद्दा जरी सोडला तरी जीवनात असामान्य व्यक्ती असतात, हे जीवनसत्य मान्य करणे आणि त्याचा शोध घेण्याचे आव्हान स्वीकारणे कलावंत टाळू शकत नाही. कारण जीवनाला पाठमोरे होणे ह्याचा अर्थ कलावंताने फक्त स्वप्नरंजनात रमणे असा होईल. स्वप्नरंजनातून कलात्मक व्यवहाराचा फारसा विकास होण्याचा संभव नाही.

सामान्यांनी व्यापलेला व्यवहार आणि असामान्यांची विकृती
  अगदी सरळ सरळ विभागणी आपण करू लागलो तर जीवनाचा प्रमुख व्यवहार सामान्यांनी व्यापलेला असतो असे दिसून येईल. जीवनात सामान्यांची संख्या जास्त असते म्हणून कलाकृतीतही सामान्यांचे चित्रण करणाऱ्या कलाकृतींची संख्या जास्त असावी अशी अपेक्षा कुणी करणार नाही कारण कलावंत केवळ 'आहे' यासाठी चित्रित करीत नाही. त्याला 'लक्षणीय' वाटते यासाठी चित्रित करीत असतो. हे सर्वसामान्य सोडल्यास दुसरा गट विकृतांचाच असतो. या विकृतांना तुम्ही असामान्यही म्हणू शकता, विकृतही म्हणू शकता. जीवनाची उभारणी करणारे सर्वच असामान्य या विकृताच्या गटात येतात. फक्त काहींच्या विकृतीला निसर्ग जबाबदार असतो. त्यांच्या वासना निसर्गतः अधिक असतात, कमी असतात. त्यांची शरीरे निसर्गतः पंगू असतात किंवा अधिक आततायी क्षुधा असणारी असतात. एक दबलेले वासना-जंजाळ संस्कृती आणि जीवशास्त्र यांच्या संघर्षातून जन्माला येते, त्या ठिकाणी जीवशास्त्र प्रबल असते. विकृतीचा हाही एक प्रकार आहे. सामान्यपणे यांनाच आपण विकृत म्हणतो. हा विकृत त्याच्या सुप्त मनाने नियत केलेल्या स्वार्थाच्या परिपूर्तीसाठी संस्कृतीचा विध्वंस करीत वावरत असतो. हा विकृत खोटा नसून खराच आहे. तो समाजात असतो, तसा कलावंताच्या मनातही असतो.

हिमालयाची सावली / १३९