पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/139

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पौराणिक नाटकांतील व्यक्तिदर्शन कितीही भव्य आणि जिवंत म्हटले तरी या व्यक्ती त्या नाटकात प्रतीक होतात, एका ध्येयवादाच्या प्रतिनिधी होतात. त्यांच्या रूपाने अनेक पदरी माणूस आपल्यापुढे उभा आहे असे मात्र जाणवत नाही.

माणसाचे माणूसपण टिकवणारा व्यवहारच खोटा?
  असामान्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा शोध ही या सर्वांच्या पेक्षा निराळी असणारी बाब आहे. हा असामान्य एका बाजूने सामान्य असतो आणि दुसऱ्या बाजूने तो असामान्य असतो. त्याच्या व्यक्तिमत्त्वात हे दोन्ही पदर सुसंगत होतात, कारण तोही एक जिवंत माणूस असतो. हे असामान्यांचे व्यक्तिमत्त्व तपासणे, त्यांचा शोध घेणे म्हणजे समाजाला उदात्त ध्येयवादाची प्रेरणा देण्यासाठी प्रतीक म्हणून, प्रचाराचे साधन म्हणून असामान्यांच्या जीवनाचा कुशल व यशस्वी उपयोग करणे नव्हे. हे उपयोगितेच्या पलीकडे जाऊन एक माणूस म्हणून असामान्यांच्या जीवनाचे आकलन करणे ही घटना प्रख्यात उदात्त नायकाची कथा आधाराला घेण्यापेक्षा निराळे असते. हा असामान्यसुद्धा आपल्या भोवताली असणाऱ्या जीवनाचा भाग असतो, तो स्वप्नातून येणारा खोटा नसतो. फार तर कोणत्या तरी स्वप्नाने झपाटल्यामुळे त्याच्या जीवनातील सर्व सुखदुःखे सामान्यांच्यापेक्षा निराळे रंग घेऊन येतात असे म्हणता येईल. अनेक पदरी, अनेकविध असलेल्या या जीवनात सामान्य जितका खरा आहे; तितकाच विकृत हाही खरा आहे. या दोघांच्या बरोबर असामान्यही तितकाच खरा आहे. माणसे सुखाच्या शोधात मूल्यांशी तडजोड करतात, हे खोटे नसून खरे आहे; पण त्याबरोबरच माणसे मूल्यांच्या शोधात स्वेच्छेने सुख पायदळी तुडवीत जातात हेही खरे आहे. सर्व असामान्य पुरुष या दुसऱ्या गटात येतात. सर्वसामान्य माणूस आपल्या जीवनात आचरण कसेही करो तो या असामान्यांच्या विषयी आस्था आणि आदर बाळगीत असतो. सामान्यांच्या मनात असणाऱ्या असामान्यांच्या विषयीच्या या प्रबल आस्थेच्या पोटीच माणस अडखळत, धडपडत आपले माणूसपण टिकवीत असतो. ज्या व्यवहारातून माणसाचे माणूसपण निर्माण होते तो व्यवहारच खोटा आहे असे समजणे ही जीवनाच्या आकलनातील गफलत मानली पाहिजे.
  समाजात असामान्य पुरुष असतात. उरलेल्या समाजाने या असामान्यांचे

१३८ / रंगविमर्श