पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/137

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

महत्त्वाची नाही, त्यांचा दर्जा महत्त्वाचा आहे. आणि मग आपण गरजेनुसार सगळी लोकप्रियता बाजूला ठेवू शकतो, जणू ती गुणही नाही आणि दोषही नाही किंवा गरजेनुसार आपण वाचकांच्या संख्येचे प्रचंडपण वाङ्मयकृतीच्या उथळपणाचा पुरावा म्हणूनही दाखवू शकतो. नाटकांच्या बाबतीत प्रयोगक्षमता ही निराळ्या पातळीवरची बाब आहे. वाचकांच्या संख्येची पातळी आणि प्रयोगक्षमतेची पातळी भिन्न असते.
  कादंबरी अगर कविता ज्या एका रसिकाचे समाधान करू शकेल तिथे तिचे सार्थक होते. नाटकाला नेहमीच एका समूहासमोर उभे राहणे भाग आहे. कारण नाटक समूहाच्यासमोर प्रयोगासाठी असते. समूहासमोर प्रयोग ह्याचा अर्थच असा की प्रयोगक्षमता हा या कृतीचा अंगभूत असणारा धर्म आहे, तो तिचा फार महत्त्वाचा नसला तरी अंगभूत धर्म असल्यामुळे गुणस्वरूप असतो. तो वाचकांच्या संख्येप्रमाणे दुर्लक्षिता येणारा भाग नाही. कानेटकरांची नाटके प्रयोगात यशस्वी होतात हे खरेच आहे आणि प्रयोगात यशस्वी होणाऱ्या नाटककाराच्या कलेविषयी ती सदोष असली तरी जिज्ञासा वाटणे स्वाभाविक आहे, पण हे माझ्या जिज्ञासेचे प्रमुख कारण नाही.

असामान्यांच्या व्यक्तित्वाचा वेध
  कानेटकरांच्याविषयी मला जे प्रमुख आकर्षण वाटते त्याचे कारण असामान्यांच्या व्यक्तित्वाचा शोध घेण्याची त्यांची जी सातत्याने धडपड चालू आहे हे आहे. या ठिकाणी घोटाळा होऊ नये म्हणून दोन बाबीत फरक टाकणे भाग आहे. असामान्यांच्या जीवनाशी निगडित असणारे कथानक ही एक निराळी गोष्ट आहे. जगाच्या रंगभूमीवर आणि महाराष्ट्रीय रंगभूमीवरसुद्धा असामान्यांचे जीवन चित्रित करणारे कथानक अगदी आरंभापासून वावरत आलेले आहे. अगदी विष्णुदास भावे जरी घेतले तरी त्यांनी आरंभ सीता-स्वयंवरापासून केला. प्रभू रामचंद्र आणि देवी सीता ही समाजाच्या दृष्टीने सामान्य माणसे नाहीत, असामान्यांच्याही पेक्षा निराळी अशी ही ईश्वरीय प्रकृतीची पातळी आहे. समाज रामचंद्रांना परमेश्वरी अवतारच मानतो. म्हणून रामचंद्राच्या विवाहाची कहाणी ही परमेश्वराच्या परममंगल विवाहाची कहाणी आहे. ते असामान्यांच्या जीवनाशी निगडित असणारे कथानक आहे. पुराणातील

१३६ / रंगविमर्श