पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/136

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकरण: ९



हिमालयाची सावली



 आजच्या मराठी नाटककारांच्यामध्ये वसंत कानेटकर हे मला एका विशिष्ट कारणामुळे विशेष लक्षणीय नाटककार वाटतात. या लक्षणीयतेचे कारण त्यांची नाटके प्रयोगांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात यशस्वी झालेली आहेत हे अंशतः असले तरी प्रमुख नाही. नाटक हा वाङ्मयप्रकार सर्व वाङ्मयप्रकारातील अत्यंत संकीर्ण असा वाङ्मयप्रकार आहे. प्राचीन काळापासून भारतीय समीक्षकांनी या वाङ्मयप्रकाराची संकीर्ण बहुलता नजरेसमोर ठेवली आहे. भरत नाट्यशास्त्रातच हा उल्लेख आलेला आहे की जगात असे ज्ञान नाही, असे शिल्प नाही, अशी कला नाही जी नाट्यात वापरली जात नाही. एकतर हा संकीर्ण व्यवहार आणि दुसरे म्हणजे तो प्रयोगासाठी असल्यामुळे त्याचा आस्वाद जितका वैयक्तिक आहे तितकाच सामाजिक आहे. समाज म्हणून ज्या कृतीचा आस्वाद घेता येत नाही ती कृती खऱ्या अर्थाने नाटक होऊ शकत नाही. कानेटकरांची नाटके प्रयोगात चालतात, प्रयोग म्हणून ती यशस्वी होतात हा त्या नाटकांचा दोष नसून गुण आहे हे समीक्षकांनी ओळखायला पाहिजे.

कविता-कादंबरीचा आस्वाद वैयक्तिक
  कविता किंवा कादंबरी हे असे वाङ्मयप्रकार आहेत की त्यांचा आस्वाद प्रामुख्याने व्यक्तिगत आहे. एखाद्या कादंबरीच्या दहा-हजार प्रती एका वर्षात खपतील, पण त्या प्रत्येकाला स्वतःला वाचणे भाग असते. ज्या वाङ्मयप्रकारात आस्वाद असा व्यक्तिनिष्ठ असतो त्या ठिकाणी रसिकांच्या दर्जाचा प्रश्न एक महत्त्वाचा प्रश्न असतो. म्हणून कविता आणि कादंबरी यांच्या बाबतीत असे आपण म्हणू शकतो की या वाङ्मयकृतीला लाभणाऱ्या वाचकांची संख्या

हिमालयाची सावली / १३५