पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/135

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नसलेला कर्ण उभा आहे अशी मांडणी शिरवाडकरांनी केलेली आहे. जण सूतपुत्र म्हणून अवहेलना सहन करणारा कर्ण शरीराने दुर्योधनाच्या पक्षाकडे आहे, पण मनाने तो कृष्णाच्या पक्षाचा आहे. अशा कर्णाचे जागृत मन दुर्योधनाचे प्रिय करण्याचा कितीही कसोशीने प्रयत्न करीत असले तरी त्या कर्णाचे सुप्त मन त्याच्याकडून जो व्यवहार घडवून आणणार तो दुर्योधनाच्या घाताचाच घडवून आणणार. कधी भीष्माने अपमान केला हे निमित्त घेऊन कर्ण दहा दिवस युद्धातून गैरहजर राहणार, कधी मी दाता आहे असे सांगून अक्षय कवचकुंडले गमावणार, अर्जुनाला मारण्यासाठी मिळालेली वासवी शक्ती घटोत्कच मारण्यासाठी वापरणार, कुन्तीला चार पांडव जिवंत ठेवण्याचे आश्वासन देणार आणि दुर्योधनाला मात्र 'तू तडजोड करू नकोस; लढ' म्हणून सांगणार, असेही चित्र आहे. कर्णाचे जागृत मन संपूर्णपणे दुर्योधनाचे हित आणि दुर्योधनाचे कल्याण यात गढलेले आहे आणि कर्णाचे सुप्त मन दर वेळी व्यवहार मात्र दुर्योधनाच्या घाताचा घडवून आणणार हा विसंवादसुद्धा कर्णात जन्मभर दाखवता येतो. अकुलींनाच्या विरोधात कुलीनांच्या रक्षणासाठी जर कुलहीन उभे राहिले तर हा विसंवाद येणारच. शिरवाडकरांच्या प्रतिभाशाली मनाने याही शक्यतेकडे आपल्या नाटकात अंगुलीनिर्देश केला आहे.
  शिरवाडकरांचे प्रतिभाशाली मन असफल साहित्यकृतीतून सुद्धा एका कथेत दडलेल्या किती शक्यता उजेडात आणीत आहे हे पाहणे आनंदाचे नाही काय?

१३४/ रंगविमर्श