पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/134

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शिरवाडकरांचे पन
  पण माझ्या मनात वेगळाच प्रश्न उपस्थित होत आहे. स्त्री-शूद्रांना पापयोनी म्हणून उल्लेखिणारे आणि चातुर्वर्ण्य मी निर्माण केलेले आहे असे सांगणारा कृष्ण शिरवाडकरांसारख्या समाजवाद्याला स्त्री-शूद्र आणि सर्वसामान्य ह्यांच्या सत्तेचा पुरस्कार करणारा जनतेचा नेता का वाटतो? मला वाटते, शिरवाडकरांच्या या जाणिवेचे कारण भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात गुरफटून गेलेले, राष्ट्रवादी प्रवाहात मिसळत आलेले शिरवाडकरांचे मन हे आहे. 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे' अशी घोषणा करणारे टिळक गीतारहस्याशी जोडलेले आहेत. गांधी आणि विनोवा हे पुन्हा गीतेशी जोडलेले आहेत. राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या लढ्यात लोकशाही आणि स्वातंत्र्य या कल्पना सांगणाऱ्यांनी पुनः पुन्हा भगवद्गीतेपासून प्रेरणा घेतलेली आहे. या प्रवाहाशी एकरूप झालेले शिरवाडकरांचे मन कृष्णाला स्त्री-शूद्रांच्या सत्तेचा पुरस्कर्ता, समतेचा पुरस्कर्ता म्हणजे जणू महाराष्ट्रीय समाजवादी पक्षाचा नेता असेच मानते. कर्णाच्या कथेत तात्त्विक दृष्ट्या पांडवांची बाजू न्याय्य आहे, उच्चतर व अधिक समर्थनीय आहे ही भूमिका घेणे हे विसंगत तर आहेच, पण जर हे मत कर्णाचे असेल तर उरलेल्या कुन्ती-पुत्रांइतकाच हा कौतेयसुद्धा कृष्णभक्त आहे असे म्हणण्याची पाळी येईल. लेखकाचे मन अनुभवाचा आशय बदलण्याला कसे कारणीभूत होते आणि कित्येकदा हेतूला विसंगत असा आशय नकळत कसा येतो याचे हे उदाहरण म्हणून पाहिले पाहिजे.

दुर्योधन- परंपरागत मोठेपणाचा पुरस्कर्ता
 कृष्ण हा सर्वसामान्यांच्या सत्तेचा पुरस्कर्ता ही भूमिका एकदा पक्की मनात बसली म्हणजे दुर्योधन आणि त्याच्या पक्षाचे लोक हे परंपरागत मोठेपणाचे पुरस्कर्ते असे चित्र आपोआपच येऊ लागते. आपल्या कुलीनत्वाचा आणि परंपरासिद्ध मोठेपणाचा अभिमान मिरवणारा दुर्योधन आणि राजांचे नेतृत्व राजेच करू शकतात असा आग्रह धरणारा दुर्योधनाच्या भोवती असणारा राजांचा मेळावा कर्णाच्या सेनापतीपदाला विरोध करतो, असे शिरवाडकरांनी दाखवले आहे. वंशश्रेष्ठत्वाच्या अहंगंडाने पछाडलेले राजे आणि तीच भूमिका असणारा दुर्योधन यांच्या बाजूने वंशशुद्धतेचा अगर श्रेष्ठत्वाचा आधार

'कौन्तेय'च्या निमित्ताने/१३३