पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/133

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

फार थोडी आहेत. शिरवाडकरांना जाणवलेल्या मदर-ऑब्सेशनमुळे 'कौतेय' या शब्दाला वेगळेच महत्त्व येऊ लागलेले आहे.
  शिरवाडकरांचे 'कौंतेय' नाटक ही कोणत्याच अर्थाने फारशी यशस्वी कलाकृती नाही ही नोंद केल्यानंतर मग हा आईविषयक पछाडलेपणाचा मुद्दा आपण समजून घेतला पाहिजे. एका बाजूने ही जशी एक अनपेक्षित घटना कौंतेय नाटकात आहे आणि ती कर्णाच्या व्यक्तिरेखेवर प्रकाश टाकणारी आहे, तशी दुसऱ्या बाजूने या नाटकात अजून एक अनपेक्षित नोंद आली आहे. शिरवाडकरांच्या डोक्यात अनेक वाटा एकाच वेळी कशा वावरत असतात आणि मग कुठल्याच वाटेने धड प्रवास कसा होत नाही याचा अभ्यास करण्यासाठी हा दुसरा अनपेक्षित फाटाही चांगला अभ्यास-विषय आहे.

श्रीकृष्ण सर्वसामान्यांच्या सत्तेचा पुरस्कर्ता
  ‘कौतेय' नाटकाच्या दुसऱ्या अंकाचा पहिला प्रवेश कर्णाचा एकनिष्ठ सेवक जांधील आणि त्याची प्रेयसी यांच्या संवादाचा आहे. या संवादात बोलताबोलता जांघील अत्यंत शांतपणे असे सांगतो की, श्रीकृष्ण सर्वसामान्यांच्या सत्तेचा पुरस्कर्ता आहे. राजे-रजवाडे, कुळांचे मोठेपण यांना बाजूला सारून श्रीकृष्ण हा सर्व स्त्री-शूद्रांना हक्काची नवी जाणीव करून देऊन सामान्यांचे एक नवे युग निर्माण करतो.कृष्ण हा स्त्री-शूद्रांच्या सत्तेचा समर्थक आहे. जांघील असेही सांगतो की हे त्याचे मत नसून कर्णाचेही हेच मत आहे. प्रश्न जर तत्त्वाचा असता तर कर्ण कृष्णाच्या पक्षालाच गेला असता, कारण कृष्णाची बाजू ही न्यायाची आहे, सर्वसामान्य जनतेच्या कल्याणाची आहे असे कर्णाला वाटते. शिरवाडकरांनी हा मुद्दा स्पर्श करून सोडून दिलेला आहे. जुन्या पद्धतीने सांगायचे तर कौरवांच्या बाजूने असून पांडवांना पक्षपाती असणे हे भीष्म-द्रोण-विदुरांचे लक्षण या यादीत कर्णाची अजून एक नवी भर टाकावी लागेल. माझ्या दृष्टीने कर्ण पांडवांचा पक्षपाती आहे का कौरवांचा पक्षपाती आहे हा मुद्दा महत्त्वाचा नाही. महत्त्वाचा मुद्दा आहे व्यक्तिगत निष्ठेमुळे कौरवांची वाजू, पण तत्त्वनिष्ठा म्हणून कृष्णाची बाजू अशा दोन बाजूंचा स्वीकार एकाच वेळी करताना दुभंगलेले कर्णाचे मन? शिरवाडकरांनीही या दिशेने फारसा प्रवास केलेला नाही. मीही या प्रश्नाची फार चर्चा करणार नाही.

१३२ / रंगविमर्श