पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/132

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कर्णाच्या हे ध्यानात आले आहे की राधेने आपले पालनपोषण केलेले असले तरी ती आपली आई नाही. आपली आई कोण या प्रश्नाचे उत्तर शोधताना कर्ण कमालीचा हळवा आणि कमालीचा बेजबाबदार असा झालेला आहे. ज्या स्त्रीन आपला जन्मतःच त्याग केला तिच्याविषयीचा अनादर हा कर्णाच्या जीवनात अखिल स्त्री-जातीविषयी तुच्छता आज अनादर म्हणून व्यक्त होतो. मग त्याला माणसाची मादी आणि कुत्र्यांची मादी यात फारसा फरक वाटत नाही आणि ज्या स्त्रीने आपला त्याग केला असेल तिने किती व्यथा भोगल्या असतील, परिस्थितीसमोर ती किती दीन, अगतिक झाली असेल आणि तिचे उरलेले सर्व आयुष्य किती व्यथापूर्ण आणि अनुकंपनीय झालेले असेल असा विचार आला की कर्ण हळवा, मातृ-पूजक बनू लागतो. शय्येवर पाय वर केला की कोणतीही मादी माता होऊ शकते, या टोकापासून विश्वातील सर्व मांगल्याचे केंद्र, सकल तीर्थातील पावित्र्याचे आगर असेल तर ते मातेचे पाय इथपर्यंत कर्णाच्या मनाचा लंबक जात असतो. हे आईविषयक पछाडलेपण ही कर्णाच्या जीवनातील वर्माची जागा आहे. कर्ण मातेची खात्री पटताच नकळतपणे जन्मभर जपलेल्या मैत्रीचा घात करून जातो.

आईविषयक पछाडलेपण
  कर्ण शेवटी माणूस आहे. या कर्ण नावाच्या माणसाकडे एक मानसशास्त्रीय हरवलेपणाची आणि आईविषयीच्या पछाडलेपणाने भारावलेल्या व्यक्तीची कहाणी म्हणून शिरवाडकर प्रथमच पाहत आहेत. दुर्दैवाने आपले सर्व नाटक या एका प्रश्नाभोवती गुंफणे शिरवाडकरांना जमले नाही. ते अनेक समस्या एकाच वेळी घेत बसले त्यामुळे सगळे नाटक विस्कळीत झाले हे खरे आहे, पण आजवर कुणाला न जाणवलेली, कर्णाच्या व्यक्तिरेखेवर संपूर्णपणे नवा प्रकाश टाकू शकणारी एक शक्यता शिरवाडकरांच्या प्रतिभाशाली मनाला जाणवली आहे. जाणवलेल्या शक्यतांचा यथायोग्य वापर करता येणे हे महत्त्वाचे आहेच; ते मी नाकारणार नाही. पण मुळात एक लोकविलक्षण परिमाण देणारी नवीनच शक्यता जाणवावी हे कमी महत्त्वाचे नाही. मराठीत पौराणिक कथा-कादंबऱ्या पुष्कळच आहेत; पण ज्या ठिकाणी कथानकाचा आमूलाग्र अर्थ बदलतो अशा नव्या शक्यता लेखकांना जाणवलेल्या दिसतात अशी ठिकाणे

'कौतया'च्या निमित्ताने / १३१