पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/131

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नसला आणि जरी सूत ही दलित, अस्पृश्य जाती नसली तरीही कर्णाच्याकडे दलितांचा नेता म्हणून पाहण्यात आलेले आहे. पण कर्णाच्या जीवनातली एक घटना अशी आहे की तिचा उलगडा शिरवाडकर ज्या पद्धतीने करतात त्याशिवाय दुसऱ्या कुणा पद्धतीने समाधानकारकरीत्या होण्याचा संभव नाही. कर्णाच्या व्यक्तिमत्त्वाला एक फार मोठा तडा या प्रसंगामुळे गेला आहे. ही कर्णाच्या जीवनातील इतरांना नीटपणे तपासता न आलेली, पण शिरवाडकरांच्या प्रतिभेने अचूकपणे हेरलेली घटना म्हणजे कर्ण आणि कुंती यांच्या भेटीचा प्रसंग आहे.
  कौरव-पांडवांचे युद्ध ऐन तोंडाशी आलेले आहे अशा अवस्थेत कुंती कर्णाकडे जाते आणि कर्णाला 'तू राधेचा मुलगा नसून माझा मुलगा आहेस' हे सत्य सांगते. कर्ण कुन्तीचा नानाविध प्रकारे धिक्कार करतो, पण सर्व धिक्कार करून झाल्यानंतर तो तिला तिची चार मुले न मारण्याचे वचन देतो. हा प्रसंगच मोठा चमत्कारिक आहे. धर्मराज जिवंत आहे तोपर्यंत पांडवांचा पराजय होऊ शकत नाही आणि भीम जिवंत आहे तोपर्यंत दुर्योधन-दुःशासन सुरक्षित राहू शकत नाहीत. कर्णाने या दोघांनाही आपण मारणार नाही असे कुंतीला अभिवचन देऊन जवळपास दुर्योधनाचा पूर्ण विश्वासघात केलेला आहे. कर्ण म्हणतो, “मी फक्त अर्जुनाला मारीन." समजा, आपण असे गृहित धरू की, अर्जुनाला मारण्यात कर्णाला यश आले आहे तर काय होईल? पांडव अतीव दुःखी होतील, पण युद्ध चालूच राहील. पण कर्णाने हे अभिवचन दिलेले आहे. मूळ महाभारतात हा प्रसंग युद्ध सुरू होण्यापूर्वीचा आहे, शिरवाडकरांनी तो युद्धाच्या सोळाव्या दिवशी अगदी सकाळी म्हणजे पंधरावा आणि सोळावा दिवस ह्यामधील उत्तररात्री दाखवलेला आहे, पण हा गौण भाग आहे.

कर्णाचे अभिवचन हा दुर्योधनाचा विश्वासघात
  मुख्य मुद्दा असा की, कर्ण कुंतीचा उत्कट रागाने धिक्कार करतो आणि कर्ण कुंतीला अभिवचन देतो. या अभिवचनात दुर्योधनाचा घात आहे, पण हे कृत्य कर्णाकडून घडते. कर्ण असे का वागतो? शिरवाडकरांचे या प्रश्नाला उत्तर असे आहे की कर्णाच्या ठिकाणी मदर-ऑब्सेशन आहे. (कृपया मी मदर-कॉम्प्लेक्स हा शब्द वापरीत नाही, इकडे लक्ष असू द्यावे). कुठे तरी

१३० / रंगविमर्श