पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/130

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकरण ८ वे





'कौंतेया'च्या निमित्ताने



  वि. वा. शिरवाडकर म्हणजेच कवी कुसुमाग्रज हा माझ्या कुतूहलाचा आणि आदराचा विषय नेहमीच राहिलेला आहे. शिरवाडकरांचे 'कौंतेय' नाटक इ. स. १९५३ सालचे आहे. 'कौंतेय' हे फार चांगले नाटक आहे अगर प्रयोगात यशस्वी असलेले नाटक आहे असे कुणीच म्हणणार नाही. स्वतः शिरवाडकरांना जरी विचारले तरी ते हे आपले सफल व चांगले नाटक आहे असे मत देणार नाहीत. प्रायोगिक दृष्ट्या फारसे यश न लाभलेल्या या नाटकाची वाचनीयता मात्र खूप मोठी आहे. नानाविध प्रकारचे दोष असणारी तरीही आपले आकर्षण टिकवून ठेवणारी अशी एक साहित्यकृती म्हणून या नाटकाकडे पाहिले पाहिजे. हे टिपण लिहीत असताना माझ्यासमोर इ. स. १९७३ सालची सातवी आवृत्ती आहे. याहीनंतरच्या काळात आवृत्त्या निघालेल्याच असणार. या नाटकाचे फारसे प्रयोग पूर्वी कधी झालेले दिसत नाहीत. अलीकडे तर त्याचे प्रयोग होतच नाहीत, पण त्याची वाचनीयता मात्र सतत चालू असलेली दिसते.
  या नाटकाचा एम. ए. च्या विद्यार्थांना शिकवण्यासाठी जेव्हा मी विचार करू लागलो त्या वेळी अनेक लक्षणीय बाबी शिरवाडकरांनी या ठिकाणी पोते भरल्यासारख्या भरून ठेवलेल्या आहेत असे मला वाटू लागले. त्यातील तीन बाबींच्याकडे या टिपणात मी लक्ष वेधू इच्छितो.

कर्ण हा दलितांचा नेता
  पहिली बाब नाटकाच्या कौंतेय या नावातच सुचविली गेली आहे. कर्णाकडे अत्यंत पराक्रमी पण दुर्दैवी म्हणून अनेकांनी पाहिलेले आहे. निष्ठेने मित्रकर्तव्य पार पाडणारा म्हणूनही त्याच्याकडे पाहिले जाते. कर्ण हा जरी दलित

रं....९
'कौतेया'च्या निमित्ताने / १२९