पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/128

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तर ती इथे दिसते. उषेची तटबंदी कोसळायला आरंभ पहिल्या अंकात होतो. दुसऱ्या अंकाच्या शेवटी उषा स्वाभाविक होऊन मुक्त होते. तिसऱ्या अंकाच्या आरंभी ती साध्या गृहिणीप्रमाणे चिडू लागते. दुसऱ्या अंकात स्वाभाविक विकासाला संधी मिळालेली गीता नुसतीच फुलत नाही तर ती नवी कविता बोलू लागते. कुंपणावर कोरांटी वाढते तशी आपण वाढलो असे तिला वाटू लागते. सतीशने 'कुंपणावरच्या कोरांटीला आज हा साज कुणी चढवला' असा कौतुकाने प्रश्नही विचारला आहे. जगात वेदना जितकी संदर बोलते तितकंच सख नाही बोलत हे स्पष्टीकरण देताना हळूच स्वतःच्या मनावरही एक प्रकाशकिरण टाकलेला आहे, कारण तोही कविताच बोलत असतो.
  हे नाटक म्हणजे एक खेळकर सुखात्मिका आहे, हा पहिला क्रम आपण आता सोडला पाहिजे. त्याबरोबरच ही खेळकर सुखात्मिका तिसऱ्या अंकाच्या शेवटी एकाएकी गंभीर होत असल्यामुळे पातळीचा छेद होतो हा दुसरा भ्रमही आपण सोडला पाहिजे. या दोन भ्रमांचा त्याग केल्यानंतर दुसऱ्या अंकात हे नाटक फार्सच्या पातळीवर जाते हा आनुषंगिक उपभ्रमही आपण आपोआपच सोडू, कारण उद्वेग आणि वैताग उत्कट करून पुढच्या सर्व गांभीर्याची पूर्वतयारी करण्यासाठी ही उग्र हास्याची गर्जना आहे. त्यामुळे जर कुणाचे कान बधिर होत असतील तर त्यांनी हे समजून घ्यायला पाहिजे की या गर्जना संपल्याच्यानंतर जेव्हा सारे शांत होते त्या वेळी आजवर ज्या सुरांना आपले कान पारखे होते ते ऐकू येण्याची क्षमता आता इंद्रियांना प्राप्त झाली आहे.

आगळी व अनोळखी विलक्षण वस्तू
 'तुझे आहे तुजपाशी' या नाटकाच्या निमित्ताने मला जे जाणवत राहिले ते मी इथे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. अशा सगळ्या प्रयत्नांच्या बाबत आपण काही ठळक मुद्दे पुनरावृत्तीने पक्के करून घेतले पाहिजेत. पु. लं. चे हे नाटक हसविणारे आहे, खदखदा हसविणारे आहे हा मुद्दा मी नाकारलेला नाही. तो स्वीकारून हे नाटक गंभीर आहे असे मला म्हणायचे आहे. ही शोकान्तिका आहे असे माझे मत नाही. ते कोणत्याच चौकटीत न सामावणारे, वृत्तींना उल्हसित करणारे, पण गंभीर, शोकगंभीर असे निश्चित शेवट नसणारे नाटक आहे, असा माझा मुद्दा आहे. हे नाटक वृत्तींचा संघर्ष सांगते, दृष्टिकोणांचा संघर्ष सांगते, ते

तुझे आहे तुजपाशी / १२७