पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/127

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

होत नाही. आपण आठ वर्षे ज्या भ्रमात जगलो त्यातून बाहेर येण्याचा उषा प्रयत्न करू लागली म्हणजे ते पहिल्याच अंकात गंभीर होते. दुसरा अंक हे नाटक सारखे फार्सच्या पातळीवर नेऊ लागतो. कारण या दुसऱ्या अंकात सतत बोलू पाहणारा वासूअण्णा मौन पाळतो आहे. याच अंकात भांग चढल्यामुळे ही माणसे आत्मा सापडला म्हणून गळ्यात गळा घालू लागतात व नाचू लागतात. अतिविशाल महिला मंडळाच्या दांभिक व शिष्ट अध्यात्मप्रीतीचे दर्शन याच अंकात होते. पुन्हा पुन्हा हा अंक विडंबन, प्रहसन आणि फार्स असा उसळून येत असतो. याचे खरे कारण हे आहे की पहिल्या अंकातील गांभीर्य इथे आता गाढ होऊ लागले आहे. सर्वांनी देशभक्ती करावी हा आग्रह धरणारी उषा स्वतः तर मनातून ढासळू लागलेली आहेच, पण आपला भाऊ श्याम आचार्यांच्या आहारी जातो आहे हे पाहून ती पूर्णपणेच हादरलेली आहे. ह्याच अंकात आपला स्वधर्म काय ही जाणीव झाल्यामुळे गीता आचार्यांच्याविरुद्ध संघर्ष करण्यासाठी तयार झाली आहे. आपल्या प्रियकराने भेट दिलेली साडी गीतेला नेसवून तिची वेणी-फणी करण्यात उषाला नवा आनंद वाटू लागलेला आहे आणि या सगळ्याच गंभीर गोष्टी आहेत. दीर्घकाळच्या झोपेतून जागे झाल्याप्रमाणे एकेकजण जांभई देत किलकिल्या नजरेने आपला स्वधर्म पाहण्यास शिकू लागलेला आहे, पण या सर्वांच्याबरोबर स्वतः आचार्यच मनातून ढासळू लागलेले आहेत. काकाजींच्या प्रभावाने भारलेल्या या वातावरणात आचार्यांच्याही मनावरचा ताण शिथिल होऊ लागलेला आहे असे दिसते.
  आपल्याला करमणूक म्हणून पाहण्याची विलासी दांभिकांची इच्छा आहे हयाचे भान आल्यामुळे आचार्य अधिकच हादरलेले आहेत. आपण सुद्धा रागावू असे आचार्य सांगतात, पण 'क्रोधामुळे बुद्धिनाश होणार नाही काय?' असे श्यामने विचारताच तेही गडबडून जातात. सत्य निर्भयपणे सांगावे असे सांगणाऱ्या आचार्यांना सत्यही कुठे काय सांगावे याचे बंधन ठेवले पाहिजे असे वाटू लागते. आचार्यांना धक्के बसायला सुरुवात याच अंकात झाली आहे. ज्या खळखळाटाने साऱ्या तटबंदींना हादरे बसतात तो जीवनातील दंभाचा आणि पिसेपणाचा खळखळाट फार्सच्या पातळीवर जाणे आणि त्यामुळे प्रश्नांचे गांभीर्य अधिकच जाणवू लागणे ही क्रिया या अंकात होते. आचार्यांची सर्व जीवनविषयक भूमिका जर कुठे अत्यंत पोकळ आणि केविलवाणी दिसत असेल

१२६ / रंगविमर्श