पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/125

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सतीशचा विनोद
  आणि मग सतीशचा विनोद सुरू होतो. खरे म्हणजे सतीशला फोनवरून आचार्य आपल्या घरी पोचले आहेत हे सांगता आले असते. नाही तरी म्हशीचे तूप हळद घालून गाईच्या तुपाप्रमाणे कसे करावे इतका सल्ला फोनवरून तो देतोच, पण ही संधी साधून मामा आल्याचा निरोप द्यायला तो घरी येतो आणि आपल्याबरोबर आपल्या फुलणाऱ्या विनोदाने तो सर्वांना बोलके करायला लागतो. रुसलेल्या प्रेयसीला तो हसण्यात तो असा भुलवतो की ती भान विसरून वसंतऋतूतल्या कोकिळेप्रमाणे ताना घ्यायला लागते. सतीशचा विनोद कृत्रिम प्रावरणात बंदिस्त होऊन गुदमरलेले उषेचे प्रेम मोकळे करणारा म्हणजे पुन्हा स्वाभाविक रतीला उल्हसित करणारा आहे. हा परिहास ऐकताऐकताच उषा विव्हल होऊन जाते आणि काकाजी सांगतात, “काय मस्त फुलून राहिले आहेत निखारे !" असे या नाटकातील विनोदाचे स्थान आहे.
  काकाजींना आचार्यांच्या विषयीही राग नाही, गांधीवादाविषयीही राग नाही. त्यांना कोणत्या दर्शनाचे खंडन-मंडन करायचे नाही. सर्व दर्शनांच्या सामर्थ्य-मर्यादांची उपजत जाण असलेला असा त्यांचा पिंड आहे. म्हणून काकाजींची टीका दर्शनावर नसते, ती फक्त ताण आणि भय कमी करून माणसांना आश्वासन देण्याचा प्रयत्न करीत असते. आचार्य जेव्हा काकाजींना तुमचा वाडा चोवीस वर्षे मागे आहे म्हणून सांगतात, तेव्हा काकाजी सरळ उत्तर देत नाहीत, पण त्यांचे अप्रत्यक्ष उत्तर असे आहे की आपल्या घड्याळाला किल्लीच द्यायची राहून गेली आहे आणि जंगलात दिवस आणि रात्र या दोनच वेळा असतात. आदिमानवाच्यानंतर पुढच्या काळात माणसाने प्रगती केली की अधोगती हे सांगता येणे कठीण आहे, हा काकाजीचा विशेष असा फटकारा आहे. या फटकाऱ्यात एक तात्त्विक सूत्र आहे. या सूत्राला रोमॅटिसिझम असे म्हणतात.

रोमँटिक पात्रे
  पु. लं. च्या या नाटकातील सर्व प्रमुख पात्रे ही रोमँटिकच आहेत. रोमँटिक म्हटले म्हणजे आपण पुन्हा एकसूरी विचार करतो. वृत्ती रोमँटिक असणारी माणसे व्यवहार सांभाळीतच नाहीत हा एक आपला भ्रम आहे. ही माणसेसुद्धा

१२४/ रंगविमर्श