पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/124

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भीती वाटत नाही. सर्वांना निरामयतेचे आश्वासन देणारा हा अनासक्त उदार पुरुष जेव्हा विनोद करू लागतो तेव्हा सगळ्या मानवी अपूर्णतांना तो जणू हसत-हसत कुरवाळून मायेने पोटाशी धरत आहे असे आम्हाला वाटायला लागते. या वातावरणातला विनोद नेहमीच हसत-खेळत गांभीर्याकडे नेणारा असणार हे उघड आहे.
  याच नाटकात असा उल्लेख आहे की मोह आणि क्रोध एकमेकांच्या जवळ असतात. याचे कारणच भीती, आसक्ती, स्वार्थ, लोभ इत्यादींत असते. जो अनासक्त रसिक आहे तो तटस्थ द्रष्टा क्रोध विसरलेलाच असतो. ही पुन्हा गीतेची शिकवण आहे. गीता पाठ आचार्यांनी केली आहे, पण ती पचली मात्र काकाजींना म्हणूनच काकाजी कोणत्या वयात कोणती गीता हाताशी घ्यावी हे श्यामला सांगू शकतात. हा पोरी गटवण्याचा उनाड सल्ला नसतो, नवा संसार मांडण्याचा हा एक वत्सलतेने केलेला प्रयत्न असतो.
  काकाजी सतीशला हुक्का देतात, शिवाय हा अस्सल ग्रामोद्योग आहे अशी कोटी करतात. काकाजींच्या असल्या प्रकारच्या कोट्या या नाटकात खूप आहेत. याच कोट्या अनेकांनी गांधीवादाचे खंडन गृहित धरलेल्या आहेत. ही समजुतीची चूक आहे. असल्या प्रकारचा परिहास तर दोन गांधीवादीसुद्धा एकमेकांशी बोलताना करतात. एखादा समाजवादी आपल्या खिशातले पैसे चोरीला गेले म्हणून तक्रार करताना त्याचा मित्र खांद्यावर हात टाकून समजूत घालतो, जाऊ दे रे, हे कुणीतरी आपपरभाव विसरलेल्या महात्म्याचे कृत्य समज. या परिहासाला मार्क्सवादी दृष्टिकोणातून आलेले अध्यात्म खंडन समजण्याची चूक आपण करू नये. माणसे वृथा संताप निवविण्यासाठी असा परिहास वापरीत असतात. पण हेच काकाजी ज्या वेळी परस्परांच्यावर एकाच वेळी लुब्ध आणि रुष्ट असणाऱ्या सतीश व उषाला परस्परांशी मोकळेपणे बोलता यावे म्हणून हुक्क्यातील निखारे फुलविण्यासाठी निघून जातात, त्या वेळी तो नुसता विनोद नसतो. निखारे विझलेले आहेत हा काकाजीचा निर्णय नव्हे, त्यांचा निर्णय निखारे मस्त फुलू शकतात आणि ते फुलायलाच पाहिजेत हा आहे. एका समजूतदार पित्याने ही रुद्ध झालेल्या प्रीतीला बहरण्यासाठी उपलब्ध करून दिलेली संधी आहे.

तुझे आहे तुजपाशी / १२३