पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/123

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शेवटी धुंडिराज हा कीवेचा विषय आहे, दयेचा विषय आहे. तो इतरांचे आदरणीय विश्रांतिस्थान होऊ शकत नाही.
  चिं. वि. जोशींचा विनोद हा स्वभावनिष्ठ म्हणून ओळखला जातो, पण त्यालाही चिमणरावच्या भोळेपणाचेच अधिष्ठान आहे. यापेक्षा पु. लं. च्या विनोदाचे स्वरूप निराळे आहे. हा विनोद खेळकर आहे, पण वात्सल्याने भरलेला आहे. गाढ सहानुभूती आणि उदार क्षमाशीलता यांचे अधिष्ठान पु. लं. च्या विनोदात असते. कित्येकदा तर पु. लं. च्या विनोदात सर्वांच्या गंभीर सहानुभूती आणि दुःखाचा विषय झालेला अश्रूच दवबिंदूप्रमाणे चकाकताना दिसतो. पु. लं. च्या एकांकिकांत याची उदाहरणे फार आहेत. ज्या ठिकाणी दुःख आपले गंभीर व्यथारूप न सोडता ती पातळी कायम राखून त्याच वेळी हास्यही होते तेथे हे स्वरूप अश्रृंनी प्रकाशाच्या कवडशांचे परिवर्तन करण्यासारखे आहे आणि म्हणून पु. लं. च्या विनोदात एकाच वेळी आपण हसतही असतो, भावनांच्या कल्लोळात वाहवतही असतो. रागावता, रागावता आपण हसतो, हसता, हसता उल्हसित होतो. हसता हसता आपण अधिक उदार, प्रेमळ व वत्सल होतो. भावनांच्या सर्व पातळ्या एकीकडे विनोदाचे तुषार उडत असताना हेलावल्या जात असतात. म्हणून हा विनोद हसत-हसत गांभीर्याकडे घेऊन जातो.
  काकाजी बेसूर ठुमऱ्यांच्यावर रागावतात हे खरे आहे, पण खरे म्हणजे त्यांना या बेसूर गाणाऱ्यांच्याविषयी राग नसतो, या मंडळींना पेलणारा सूर घेण्याची बुद्धी होत नाही याचा विषाद असतो. बुद्धिबळ खेळता-खेळता ते गाण्याच्या आठवणीत गढून जातात आणि संगीताच्या आठवणी सांगताना व्यवहारवाद्यांच्याविषयी तुच्छतेने बोलू लागतात, पण तिथेही या मंडळींनी आपल्या जीवनाचा आनंद गमावला याविषयीची खंतच जास्त असते. सर्वांच्यावर आपल्या व्यापक सहानुभूतीची पाखर घालणाऱ्या श्रेष्ठ कुटुंब-पुरुषाने कौतुक म्हणून निरनिराळ्या मंडळींची थोडीशी टवाळी करावी असे काकाजींच्या सगळ्या विनोदाचे स्वरूप आहे. काकाजी खऱ्या अर्थाने निर्वैर झालेले आहेत. म्हणूनच नोकर मंडळी त्यांच्याशी बरोबरीच्या नात्याने वागू शकतात. नोकरांना त्यांनी दिलेल्या नोकरीहून काढून टाकण्याच्या धमक्या हा नोकरांच्यासाठीसुद्धा गमतीचा विषय झालेला आहे. सर्वांना संकटाच्या वेळी काकाजींचा आधार हवा असतो आणि या सामर्थ्यवान पुरुषाविषयी कुणालाच

१२२ / रंगविमर्श