पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/122

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रभावी आहे यात वाद नाही. या विनोदामुळे या नाटकाच्या प्रायोगिक यशात भर घातलेली आहे हे तर खरेच, पण या विनोदाने या नाटकातील आशयाला उचित असे एक वेगळे भावनात्मक परिमाण मिळवून दिलेले आहे. पु. लं. च्या विनोदाचे हे एक नेहमीचे वैशिष्ट्य आहे. त्यांचा विनोद मनावरील ताण कमी करणारा असतो इतकेच खरे नाही. त्या विनोदाच्या पाठीमागे एक समंजसपणा असतो. कुणाच्याहीविषयी शत्रुत्वाने भरलेला विखार नसणे हे पु. लं. च्या विनोदाचे वैशिष्ट्य आहे. म्हणून दरक्षणी हा विनोद आपल्या मनातील काही किल्मिषे झाडून टाकणारा, आपल्याला अधिक सुजाण व समंजस करणारा असा वाटतो. तावातावाने आपण आपल्या एखाद्या मित्राशी भांडायला जावे आणि त्याने हात धरून जवळ बसवून घेऊन आपल्या रागीटपणाचेच कौतुक सुरू करावे व एकदा आपल्याकडे पाहून हसावे म्हणजे जसा सगळा ताण मोकळा होऊन जातो, आपण आपला रागही विसरतो आणि समंजस होऊ लागतो असा काही प्रकार पु. लं. च्या विनोदात सारखा घडताना दिसतो. प्रायः विनोद बौद्धिक चमक दाखवणारा असतोच. विसंगतीच्या सूक्ष्म छटा टिपण्याइतकी बुद्धी तरल असल्याशिवाय विनोदाचे हत्यार कुणाला वापरताच येणार नाही. पु. ल. हे मराठीतील श्रेष्ठ विनोदकार आहेत ह्याविषयी रसिकांचे दुमत कधीच नव्हते.
  दुर्लक्षित राहणारा प्रश्न आहे तो हा की ह्या विनोदाची जातकुळी कोणती आहे? कोल्हटकरांचा विनोद हा सर्व सुधारणांच्या बाजूने सनातन्यांच्या श्रद्धांच्याविरुद्ध उभा आहे. सर्व परंपरावादी मनोवृत्ती हास्यास्पद करून टाकणे हेच कोल्हटकरांचे वैशिष्ट्य आहे. सनातनी परंपरावादाला उपहासविषय करण्यात कोल्हटकरांना फार मोठे यश आलेले आहे, हे मान्य केले तरी पांडुतात्या, बंडूनाना आणि सुदामा ही मूर्त्यांची त्रयी म्हणूनच शिल्लक राहते. आपण त्या विनोदाकडे कसेही जरी पाहिले तरी विनोदविषय झालेल्या व्यक्ती आणि प्रश्न यांच्याविषयीची तुच्छता आपण टाळू शकत नाहीत. असल्या प्रकारचा विनोद बुद्धीला रिझवणारा असला तरी तो कधी भावनेच्या पातळीवर जाऊ शकत नाही. फार तर त्या ठिकाणी भावनेची पातळी तच्छता आणि तिरस्कार अशी एकेरी राहते इतके आपण म्हणू शकू गडकऱ्यांचा विनोद प्रायः ह्याच जातीचा आहे. त्याला अपवाद असेल तर धुंडिराजाच्या विनोदाचा आहे. धुंडिराज हा आपल्या सहानुभूतीच्या आणि आपुलकीचाही विषय होतो, पण

तुझे आहे तुजपाशी / १२१