पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/121

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सर्वच क्षेत्रांतील अपूर्णतेला क्षमा करणारा आणि सर्वच क्षेत्रांत रस घेण्यास उत्सुक असणारा हा मानवी पुतळा म्हणजे स्वातंत्र्याच्या स्वाभाविक उद्यानात आवश्यक असणारा एक नमुना आहे, जो सारीच झाडे झुलती ठेवतो, सर्वच झरे वाहते ठेवतो.
  आचार्य हा पारतंत्र्याच्या असामान्य विकृतीशी टक्कर घेण्यात 'धुंद असलेला एकांगी कर्मठ आहे. राष्ट्राच्या जीवनात याही वृत्तीची गरज असते. काकाजी हा नैसर्गिक स्वातंत्र्याच्या जगात स्वार्थ आणि विलासाच्या आहारी जाण्यापासून बचाव करणारा सर्व पातळीवरील सर्व कणांच्या मुक्त विकासाला वाव देणारा एक समंजस, तरीही अनासक्त रसिक आहे. राष्ट्राच्या जीवनाला याचीही गरज लागते. या दोन दृष्टिकोणांपैकी कोणत्या परिस्थितीत कोणता राग गावा आणि गाणाऱ्याने आपल्याला पेलणारी पट्टी कोणती याची निवड कशी करावी हा खरा प्रश्न आहे. म्हणून काकाजींनीसुद्धा नाटकाच्या शेवटी सूत काढून पाहिले आहे. ह्याला ते मस्त वाटणारे एक पाप म्हणतात. खरे म्हणजे काकाजींसाठी सगळेच आनंद आहेत, त्यांना पाप काहीच नाही. काकाजींनी आचार्यांना आश्वासन दिले असेल तर ते वानप्रस्थ घेऊन जंगलात राहण्याचे आहे. या जंगलात आचार्यांनी चिंतन करावे, काकाजींनी शिकार करावी. कारण काकाजीसुद्धा मनाने केव्हाचेच संन्यासी होऊन बसलेले आहेत.
  एवढा सगळा गंभीर आशय आपल्या पोटात सामावणारे, सर्व गंभीर आणि श्रेष्ठ पायांच्या जीवनातून साकार होणारे 'तुझे आहे तुजपाशी' सारखे नाटक कितीही खेळकरपणे सुरू झाले तरी क्रमाने ते गंभीरच होत जाणार. कारण गांभीर्य हीच या नाटकाची प्रकृती आहे. ही शोकात्मिका नव्हे, हे तर उघडच आहे, पण ती सुखान्तिका आणि सुखात्मिकाही नव्हे. ते ट्रॅजिडी आणि कॉमेडी अशा तटबंदीत स्वतःला बंदिस्त न करणारे, कॉमेडीचे घटक आत्मसात करणारे, पण मूलतः गंभीर नाटक आहे. ही त्या नाटकाची विलक्षण प्रकृतीच त्याला नव्या नाटकात जागा द्यायला भाग पाडते.

विनोदाची जातकुळी कुठली?
  __ असे जर असेल तर या नाटकातील विशिष्ट अशा खेळकर भासणाऱ्या शैलीचे आणि विनोदाचे स्वरूप काय समजावे? कारण हा विनोद अतिशय

१२०/ रंगविमर्श