पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/120

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

गमावली याची काकाजींना खंत नाही. कारण भरपूर पैसा जवळ असावा म्हणजे विपुल सुखोपभोग घेता येतील हे काकाजींचे मतच नाही. सत्ता, संपत्ती यातून सुख विकत घेता येते असे त्यांना वाटत नाही. सुख, आनंद आणि प्रसन्नता ही मनाची वृत्ती आहे, तिच्यासाठी जगावर प्रेम करणारे औदार्य आणि सर्वांना क्षमा करणारे वात्सल्य लागत असते. काकाजी सांगताहेत तो रस घेण्याचा मुद्दा हा आहे. या नाटकात काकाजींनाच विचारले गेले आहेस्थितप्रज्ञ कसा असतो? काकाजींनी समोरच्या गाढवाकडे बोट दाखवून सांगितले आहे, स्थितप्रज्ञ असा असतो. हा नाट्यप्रसंगातील चकवा आहे. कारण गीतेतील स्थितप्रज्ञ समुद्राप्रमाणे सर्व भोग स्वीकारून पचविणारा आणि सर्व प्रकारे क्षुद्रतेतून भव्यता प्रगट झाल्यामुळे प्रसन्न असलेला तरीही कर्तव्य स्वीकारणारा असा आहे. स्थितप्रज्ञ काकाजींनी दाखविलेल्या गाढवासारखा नसतो. प्रेक्षकांना गाढवाकडे पाहण्यास सांगून काकाजी त्यांची मिष्किलपणे खिल्ली उडवीत आहेत, कारण स्थितप्रज्ञ काकाजींसारखा असतो.
  म्हणूनच या नाटकात आचार्यांनी असे म्हटले आहे की, “काकाजी, तुम्ही शांत आहात. तुम्हाला तमोगुणाचा स्पर्श झालेला नाही.” पु. लं.नी कुठे तरी भगवद्गीतेतील स्थितप्रज्ञाची लक्षणे टाचण करून ठेवली असावीत आणि ती काकाजीत क्रमाने बसवून दिली असावीत असे हे चित्र आहे. शरीर न नाकारणारा पण शरीराच्या आहारी न गेलेला, भोग स्वीकारणारा पण भोगलंपट नसलेला, रसिक पण आसक्त नसलेला, जगातल्या सर्व श्रेष्ठ आणि चांगल्या गोष्टींच्याविषयी श्रद्धा व आदर बाळगणारा, पण विभूतीच्या वैभवाला प्रणाम केल्यानंतर सामान्यांच्या जीवनातील सामान्यपणालाच वत्सलतेने कुरवाळून फुलविणारा, व्यक्तिगत सुखदुःखाच्या पलीकडे गेलेला हाही एक माणूस आहे. त्याच्या या वृत्तीमुळेच तो महान झाला आहे. व्यावहारिक कर्तृत्व त्याच्याजवळ नाही हे क्षम्य झाले आहे.
  काकाजींना खरे म्हणजे देशासाठी हसत हसत जे फासावर गेले त्यांच्याविषयी आदर आहे. फक्त त्यांचे म्हणणे इतकेच आहे की, देशासाठी बेफिकीरपणे मरणारा क्रांतिकारक आणि सूरांच्या मस्तीत राजाची इतराजी पत्करून मरणाला एका क्षुद्र वस्तूप्रमाणे लेखणारी गायिका यांच्यात सरस-नीरस ठरविणे कठीण आहे. सर्व क्षेत्रांतल्या ध्येयवादाला मान्यता देणारा,

तुझे आहे तुजपाशी / ११९