पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/119

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अपयशाला नाही. त्यांचा जर विरोध असेल तर न पेलणाऱ्या पट्टीत गाण्याचा अट्टाहास करून सर्व जीवन कृत्रिम आणि बेसूर करून घ्यायला आहे. वादाचा विषय जे स्वाभाविक, सुंदर आणि मधुर आहे त्याच्याविषयी अट्टाहासाने अप्रीती दाखवून स्वतःचे जीवन निरर्थक करून घेण्याला हा विरोध आहे.
  पुष्कळ वेळा हे लक्षात येत नाही की काकाजी हा सामान्यांचा प्रतिनिधी नव्हे. आचार्यांच्या ध्येयवादाला एक वेगळी दिशा असेल. काकाजींच्या ध्येयवादालासुद्धा एक वेगळी दिशा आहे. हा दिशाभेद मान्य केल्यामुळे काकाजी सामान्य ठरत नाहीत. काकाजींना आचार्यांची भूमिका मान्य नाही. जीवनाच्या स्वाभाविकतेला प्रतिरोध करणारे, कृत्रिम, आततायी वेड काकाजीला मान्य नाही, पण त्याबरोबरच पैशाच्या नादी लागून सुख गमावणाऱ्या निरानंद वन जगणाऱ्या सामान्यांच्याविषयीसुद्धा काकाजींना तच्छताच वाटते. त्यांनी आचार्यांना हातगाडीवर घालून आणण्याचा सल्ला दिला त्याचप्रमाणे पै-पैसा जमवून म्हातारपणी एक बंगला बांधणाऱ्यांनाही कारकुनाची कढीचट अवलाद असे विशेषण बहाल केलेले आहे..
  काकाजी हे रसिक आहेत; त्यांना निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेण्याची हौस आहे, त्यात स्वतःला हरवून घेण्याची जिद्द आहे. जंगलातून डौलदारपणे चालणाऱ्या वाघाला, जंगलच्या बादशहाला समोर जाऊन कुर्निसात करावा असे त्यांना वाटते. कॉलेजमधल्या घाबरट तरुणांच्यापेक्षा त्यांना खुल्या जंगलातील हरिणींचा राजा मोहक वाटतो. जग सुंदर आहे, ते रुसण्यारागावण्यासारखे नाही, ह्या जगावर प्रेम करण्यास आणि त्याचे सौंदर्य पाहण्यास आपण शिकले पाहिजे, मनाला समाधान आणि समृद्धी या स्वार्थनिरपेक्ष रसिकतेतून प्राप्त होईल असे त्यांचे मत आहे. स्वाभाविकपणेच स्त्री-पुरुषांच्या रती, प्रीती, वात्सल्यात त्यांना रस आहे. सूत जुळवण्याच्या काळात सूत काढीत बसणे त्यांना मान्य नाही. सगळ्याच कलांच्याविषयी, काव्याच्याविषयी, खेळ आणि क्रीडांच्याविषयी त्यांना रस आणि आस्था आहे, पण हा काकाजींच्या मनाचा एक भाग आहे. त्यांना कशाचीच आसक्ती आणि मोह नाही. हाही त्यांच्या मनाचा दुसरा महत्त्वाचा भाग आहे. हा जीवनात रस घेणाऱ्या अनासक्ताचा एक सांख्ययोग आहे. ती सामान्यांच्या आटोक्यातली गोष्ट नाही..
  आपले घर सधन, श्रीमंत आणि प्रतिष्ठित घर होते, ती समृद्धी आपण

११८/रंगविमर्श