पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/117

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

निरोप देऊ शकते आणि देशसेवेला वाहून घेऊ शकते. चालू असणारे सगळेच कार्य निरुपयोगी आणि मिथ्या आहे हे कळल्यानंतर तितक्याच शांतपणे ती कामाचा निरोप घेऊन प्रियकराकडे परतू शकते. देशासाठी आपले जीवन देताना तिने प्रियकराचा निरोप घेतला असेल, पण ते स्वप्न तिच्या मनात तसेच दबा धरून आहे. अशा आयुष्यभर सोबत करणाऱ्या प्रेमाचाच एखाद्या ध्येयवादासाठी निरोप घेण्यात अर्थ असतो. जे निरोप घेतला जाताच विसरले जाते ते प्रेम इतके उथळ असते की निरोप न घेताही समोरासमोर हातात हात घालून जोडपी उभी असताना ओसरणाऱ्या पुराप्रमाणे त्यांच्यामधून वाहून जाते. या उषेच्या शेजारी जिला पूर्णपणे फुलण्याची कधी संधीच मिळाली नाही अशी एक गीता आहे. तिची तर प्रकृती पूर्णपणे गंभीरच आहे.
  वरवर दिसायला या नाटकातील वासूअण्णा, जगन्नाथ, भिकू माळी ही मंडळी थिल्लर दिसतात, पण त्यांच्याही श्रद्धा, निष्ठा, जाणिवा अतिशय दृढ आहेत. पोरवयाला शोभणारा थिल्लरपणा असेल तर तो फक्त श्याममध्ये आहे.

काकाजींचे पात्र मुळातच दुबळे
  ह्या नाटकाला संपूर्णपणे आच्छादून टाकणारे जर कोणते पात्र असेल तर ते काकाजींचे आहे. पु. लं. नी खरी वमें निश्चित करून ठेवलेली असतील तर ती आचार्य आणि काकाजींची आहेत. सर्वांच्या हसण्याचा विषय होणारे आचार्यांचे पात्र त्यांनी एका त्यागी ध्येयवाद्याचे घेतले म्हणून तो निखालसपणे उपहासाचा विषय होऊ शकत नाही आणि सर्वांच्यावर आपल्या भव्य व्यक्तिमत्त्वाने मात करणारे काकाजींचे पात्र त्यांनी मुळातच दुबळे केले आहे. एका सधन घराण्यात जन्माला आलेला, घराण्याला उतरती कळा लागल्यानंतर नोकरीत शिरलेल्या आणि नुकत्याच निवृत्त झालेल्या अशा माणसाचे हे पात्र आहे. या नाटकापुरते पाहायचे असेल तर काकाजींचे कर्तृत्व काय? त्यांनी नोकरी शांतपणे केली. शिकार केली, गाणी ऐकली. भावाच्या दोन अपत्यांचे संगोपन केले. फारसे मोठे कर्तृत्व नसणाऱ्या आणि कर्तृत्वाची कोणती आकांक्षाही नसणाऱ्या अशा स्थितिवादी माणसाचे हे चित्र आहे. या नाटकात ज्याचा पराभव होतो त्याला पु. लं. नी बलवान कणा दिलेला आहे, ज्याचा विजय होतो तो माणूस त्यांनी वर्मात दुबळा ठेवला आहे. खरे म्हणजे हा काकाजी या माणसाचा विजयच नव्हे,

११६/ रंगविमर्श