पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/116

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पात्रांच्याविषयी म्हणणे भाग आहे. अतिशय उज्ज्वल शालेय कारकीर्द असलेला डॉ. सतीश हा उषाचा प्रियकर आहे. तुझ्यापेक्षा राष्ट्राला अधिक गरज आहे असे सांगून त्याला जेव्हा प्रेयसीने निरोप दिला तेव्हा थिल्लर पात्राप्रमाणे सतीश खंतही करीत बसला नाही, संतापाने वेडा होऊन सूड घेण्याची इच्छा करण्यासाठी तो खलनायकही नाही. जीवनात आनंद घेणारा तो एक चांगला क्रिकेटचा खेळाडू आहे. निकोप मनाने जगाचे सत्य समजून घेणारा तो एक यशस्वी डॉक्टर आहे. तरीही त्याने स्वतःची. काव्यमयता गमावलेली नाही. आपल्या प्रेयसीच्या निर्णयस्वातंत्र्याला मान देणारा, स्वतःला कोणत्याही प्रकारे क्षुद्र आणि तुच्छ होऊ न देणारा, प्रेमभंगामुळे अधिकच समंजस व उदार झालेला असा हा माणूस आहे. अतिशय एकनिष्ठपणे प्रेम करणारा आणि इतरांच्या स्वातंत्र्यावर आघात न करता शांतपणे वाट पाहात बसणारा तो प्रेमवीर आहे. एखाद्या स्वप्नाळ प्रेमकथेत सहज शोभून जाईल असे हे निष्ठावंत प्रियकराचे दिलदार आणि देखणे पात्र आहे, पण स्वप्नाळू जगातला भाबडेपणा त्याच्याजवळ नाही. खोटे भ्रम निर्माण करणारे बुडबुडे सतीश चटकन फोडून टाकतो. सत्य हे भयंकर असते याची त्याला जाणीव आहे. तत्त्वज्ञानाचे प्रचंड पंडितदेखील अपचनावर एरंडेलच घेतात याची सतीशला जाणीव आहे. माणूस स्वप्नकथेप्रमाणे प्रेम करू लागला म्हणजे तो काव्यमय, भावनाप्रधान, भाबडाच असावा, तो कठोर व्यवहारी आणि वास्तववादी नसावा ही अपेक्षा करावी किंवा वास्तवावर दृढपणे पाय रोवून उभ्या असणाऱ्या माणसाच्या मनात एखादा स्वप्नांचा कुंज नसावा ही अपक्षा करणे हे दोन्ही वेगवेगळ्या प्रकारचे एकांगी आग्रहच आहेत. गुंतागुंतीच्या जीवनात, व्यवहारात कुशल आणि यशस्वी ठरणाऱ्या माणसांच्या उरातसुद्धा एखादे स्वप्न अधीर चंचलपणे डोळ्यांची उघडझाप करीत दबा धरून बसलेले असतेच. सतीश असा आहे.

उषा आणि गीता
  आणि डॉ. सतीशची प्रेयसी उषा देवासकर ही अशीच आहे. तीही थिल्लर नाही. ती पुरेशी काव्यमय, तरुण आणि प्रेम करण्याची क्षमता असणारी आहे, तशी ध्येयनिष्ठा, आग्रही, मनस्वी आणि स्वतःचा संसार नाकारणारीही आहे. एखाद्या उदात्त ध्येयवादाने प्रेरित होऊन ती अत्यंत शांतपणे आपल्या प्रियकराला

तुझे आहे तुजपाशी / ११५