पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/115

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

काही प्रमाणात एकसारखी आहे. एका उदात्त करुणेच्या दर्शनाने दुसऱ्याचा विस्मृत झालेला मूळ वैराग्यशाली स्वभाव पुन्हा एकदा उसळून वर यावा ही घटना खेळकर सुखात्मिकेत सामावणारी नाही.
  आचार्यांचा दोष काय आहे? मधून-मधून त्यालाही आपण सामान्य माणसासारखे जगावे असे वाटते. प्रवाहात पोहताना आपले हात थकले असे त्याला वाटते. असामान्य म्हणून जगल्यानंतर सामान्यांच्यासारखे जगण्याची हिंमत त्याला होत नाही, हा आचार्यांचा दोष आहे काय? ज्याला तरुण वयात कधीच कोणत्याच स्त्रीचे आकर्षणच वाटले नाही त्याच्या जन्मभर ब्रह्मचारी राहण्याला अर्थ नसतो. ज्याला तारुण्य होते, तारुण्य- सुलभ भावना होत्या, निर्दोष नैसर्गिक जाणिवा होत्या त्यानेच आपल्या नैसर्गिक प्रेरणांच्यावर एखाद्या ध्येयाच्यासाठी वेडे होऊन मात करावी ह्याला अर्थ असतो. हा माणूस निष्ठेने ब्रह्मचर्य सांभाळेल, पण मधून-मधून त्याला आपल्यालाही घर-संसार असावा असे वाटेल हे उघड आहे. किंबहुना त्याला असे वाटते म्हणूनच त्याच्या वैराग्याला अर्थ असतो. एरव्ही जगातले सर्व नपुसक आदरणीय ठरले असते.
  आचार्यांच्या जीवनात त्याग आणि कर्तव्य, सामान्य जीवनाची त्याची इच्छा आणि असामान्य ध्येयाचा पाठलाग करताना त्याने स्वेच्छेने स्वीकारलेली सर्व यातना, त्याची अहंता आणि औदार्य असा सगळाच मोठा गुंतागुंतीचा संग्राम चाललेला असणार. हे पात्रच खेळकर सुखात्मिकेचे नव्हे आणि ज्या ठिकाणी हे नाटक संपते त्या ठिकाणी आचार्यांनी सुखाचा आशीर्वाद देऊन गीतेवरचा अधिकार सोडलेला आहे, पण यामुळे आचार्यांचा जीवनक्रम बदलणार नाही. आता त्यांना सूर सापडला असल्यामुळे ते संताप आणि चिडखोरपणा यांवर मात करू शकतील, पण आपली गरज संपलेली आहे तरीही इथून आपल्याला याच मार्गावर एकटे चालणे भाग आहे याची नवी जाणीव आचार्यांना झालेली आहे. आजतागायत आचार्यांचे जीवन भीतीवर मात करणाऱ्या अहंतेचे प्रदर्शन करीत आले. यापुढे त्यांच्या जीवनातील विफल केविलवाणेपणा वाढत जाणार आहे हा शेवट काही सुखात्मिकेचा शेवट नाही.

डॉ. सतीश : एकनिष्ठ प्रेमवीर
  हे जे आपण आचार्यांच्याविषयी विचार करतो आहो तेच इतरही प्रमुख

११४/ रंगविमर्श