पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/114

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सोडलेले आहे. त्यांनी स्वेच्छेने दारिद्र्य व फकिरी पत्करलेली आहे. त्यांचे सगळे जीवन देशासाठी पडेल तो त्याग करण्यात खर्चिले गेले आहे. स्वातंत्र्य मिळताच या मंडळींना कृतार्थ व धन्य वाटायला पाहिजे. या बिंदूवर येताच त्यांचे सगळे राग-लोभ जळून जाऊन ते निष्काम, क्षमाशील, प्रसन्न व उदार व्हायला पाहिजेत. असे होत नाही. ज्यांचे असे होते ती माणसे उपेक्षिली जातील पण हास्यास्पद होत नाहीत. मानवी जीवनाची अपूर्णता ही आहे. या कृतार्थतेच्या टप्प्यावर आपली गरज संपली हे समजून घेऊन आशीर्वादापुरते राहणे माणसे पत्करीत नाहीत; ते गरज नसताना आपली गरज पटवून देऊ लागतात. पारतंत्र्याची अनैसर्गिक विकृती संपल्यानंतरसुद्धा स्वातंत्र्यातील स्वाभाविक वाहत्या प्रवाहावर ते कृत्रिमपणे बंधने लादू लागतात. अहंतेच्या पूजेची ही विकृती आहे. या विकृतीतच आचार्य गढून जातात आणि ते संपूर्णपणे निरुपयोगी होतात. आपली गरज नसताना गरज पटविण्याचा उद्योग करणारा हट्टी माणूस नित्य नव्या दांभिकाच्या मेळाव्याने घेरला जातो. आचार्यांचे खरे मन आणि जीवन हे नव्हे. आचार्यांचे खरे जीवन कर्तव्यपूर्तीचे, व्रतनिष्ठेचे आहे. नव्या परिस्थितीत एक नवाच कृत्रिम मुखवटा आचार्यांच्या शरीरावर, त्यांच्या मूळच्या व्यक्तित्वावर चढून बसलेला आहे. गीतासुद्धा सांगते, “अलीकडे ते चिडखोर आणि संतापी झाले आहेत. पूर्वी ते असे नव्हते.” एका क्षणी आपण अनुकंपेचा आणि दयेचा विषय झालो आहे हे कळताच आचार्यांचा मुखवटा गळून पडतो आणि त्यांचा मूळचा स्वेच्छापूर्वक अधिकारत्याग करणारा पिंड उसळून वर येतो.

आचार्यांचा दोष
  आचार्य जर कोसळले असतील तर ते काकाजीकडे पाहून नव्हे किंवा उषा व सतीशच्या विरोधामुळे नव्हे. आचार्य कोसळले आहेत ते गीतेच्या ठिकाणी जागृत झालेल्या दया व अनुकंपेमुळे. जर एखाद्या व्यक्तीच्या स्वेच्छापूर्वक सुखत्याग करणाऱ्या उदार करुणेसमोर आचार्यांचे मुखवटे गळून पडत असतील तर त्याचे कारण हे आहे की, समोर दिसणारा आणि हाताशी आलेला सुखाचा संसार कर्तव्य म्हणून सोडून आचार्यांचा पत्कर घेणारी गीता आणि ऐन तारुण्यात सर्व सुखे लाथाडून स्वातंत्र्यलढ्याचा पत्कर घेणारे आचार्य यांची जातकुळी

रं....८
तुझे आहे तुजपाशी / ११३