पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/113

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दिवसात त्यांना तसेच नागवे राहू देण्यात आले. तरट आणि बोरे गुंडाळूनच हा माणूस काही महिने नागवा राहत होता. शेवटी त्याला खादीचे कपडे वापरण्याची परवानगी मिळाली. माझ्या आठवणीप्रमाणे या कार्यकर्त्यांचे नाव साठे असे होते, कदाचित ते चूक असेल. सहा महिने भांडून, झगडून मारहाण, अपेष्टा, नागवेपण, छळ सहन करून ह्या माणसाने काय मिळविले? या प्रश्नाचे उत्तर जे करंटे लोक जाडे-भरडे खादीचे कपडे मिळविले, असे देतील ते स्वतंत्र राहण्यास नालायकच म्हटले पाहिजेत.
  स्वातंत्र्याचा लढा असाच असतो. तो अतिरेकी, आग्रही, हट्टी, एककल्ली, मानी, जीव देण्यास आणि घेण्यास तयार असणाऱ्या कर्मठांकडूनच पुढे रेटला जात असतो. आचार्यांचे दोष असतील तर पारतंत्र्य या असामान्य परिस्थितीच्या विरुद्ध झगडताना स्वेच्छेने आपले डोके फोडून घेण्यास तयार झालेल्या एकांगी कर्मठाचे ते दोष आहेत. लढ्याला अशा कर्मठांचीच गरज असते. मानवी जीवनाची एक चमत्कारिक परिस्थिती अशी आहे की असामान्य परिस्थितीशी झगडणारे अतिरेकी जेव्हा विजयी होऊन स्वाभाविक परिस्थिती निर्माण करतात तेव्हा नव्या काळाच्या नव्या गरजांच्या संदर्भात ही अतिरेकी माणसे कालबाह्य होऊन जातात. कोणत्याही समाजासाठी, देशासाठी स्वातंत्र्य हीच स्वाभाविक आणि नैसर्गिक स्थिती असते. हे स्वातंत्र्य मिळताच इतर सर्व प्रश्न महत्त्वाचे होऊन जातात. मग कला आणि ज्ञान महत्त्वाचे असते. सामान्यांच्या सामान्य संसारातील साधेसुधे सुखदुःख, आनंद, हर्षामर्षाचे प्रसंग, राग, लोभ आणि रुसवे यांना महत्त्व येत असते.
  आचार्यांची अडचण झाली असेल ती ही आहे की, स्वातंत्र्य मिळाल्याबरोबर त्यांचा सर्व कर्मठपणा हा आता कालबाह्य झालेला आहे. या नव्या बदललेल्या परिस्थितीत आपण मागे पडू, विसरून जाऊ याची भीती आचार्यांना वाटू लागलेली आहे म्हणून ते अधिक आक्रमक, अधिक त्रासदायक व चिडखोर बनलेले आहेत. आपण संपतो आहो ही धास्ती आणि जबरदस्त अहंता यामुळे आचार्य नव्याने अस्वाभाविकपणे वागू लागलेले आहेत. हा जो त्यांचा कालबाह्य झालेला दृष्टिकोण तोच ते हट्टाने चालवतात. एवढ्याचपुरता हा माणूस हास्यास्पद होतो.
  खरे म्हणजे आचार्यांनी तरुण वयातच देशासाठी खासगी संसारावर पाणी

११२ / रंगविमर्श