पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/112

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सुखात्मिकेत नसते आणि खेळकर सुखात्मिकेतसुद्धा या माणसाला उपहासास्पद समजणे शक्य नसते. आचार्यांचे सगळे दोष मान्य करूनसुद्धा हे व्यक्तिमत्त्व गमतीने घेऊन चेष्टा करून सोडून देण्याचे व्यक्तिमत्त्व नव्हे ही गोष्ट उघड होईल.
 आचार्य हा परिपूर्ण, उदात्त मानव नाही. त्याच्यात मर्यादा आहेत, उणिवा आहेत. त्याचा इतरांना त्रासही भरपूर होतो, पण नाटकातील विनोदविषयक झालेल्या पात्राकडे कनिष्ठ व तुच्छ दर्जाचे पात्र म्हणून ज्या भूमिकेने आपण पाहू शकतो त्या भूमिकेने आचार्यांकडे पाहणे त्याचे संपूर्ण चित्र नजरेसमोर आल्याच्यानंतर प्रेक्षकांना अशक्य होऊन जाते.
  पारतंत्र्य ही असामान्य परिस्थितीच असते आणि या असामान्य परिस्थितीशी टक्कर घेण्याचा प्रयत्न करणारे लोक तसे अतिरेकीच असतात. नफ्या-तोट्याचा सर्व बाजूंनी सारासार विचार करणारे लोक एखाद्या देशाच्या स्वातंत्र्यलढ्याला निरुपयोगी होत असतात. भारताच्या स्वातंत्रलढ्यातील तर अनेक बाबी सुट्या सुट्या पाहिल्या तर हास्यास्पदच दिसतात. एवढ्या विशाल समुद्र-किनाऱ्यावर कुणीही जाऊन परातभर पाणी आणू शकला असता आणि हे पाणी उन्हात ठेवले की त्याचे मीठ बनते. ही गोष्ट मोठ्या शौर्याचीही नव्हती, फार पराक्रमाचीही नव्हती, तिला मोठ्या विद्वत्तेची गरजही नव्हती, पण हीच एक घटना लाख लोकांना नवी प्रेरणा देणारी ठरली, ब्रिटिशांच्या सत्तेला हादरा देणारी ठरली. कारण पणाला लागलेला प्रश्न परातभर पाण्याचा नसतो. आपल्या देशासंबंधी कायदा करण्याचा परकीय सरकारला हक्क नाही, हे जाहीर रीतीने बजावायचा असतो. या सत्याग्रहात लुटलेल्या मिठागरातील मूठभर मीठ जतन करण्यासाठी लोकांनी डोकी फोडून घेतली आहेत. त्याही काळात या मंडळींना हसणारे लोक होतेच, पण ते नाकाच्या नीट, इमाने-इतबारे सरकारची नोकरी करून आपला पगार घट्ट ठेवून नंतर हसणारे लोक होते. स्वातंत्र्यलढ्याचे स्वरूपच असे असते.
  पुण्यातील एक प्रसिद्ध गांधीवादी कार्यकर्ते तुरुंगात गेले. आपण खादीखेरीज इतर कोणताही कपडा वापरणार नाही हे त्यांनी बजावले. जेलमधील कैद्याचा वेष त्यांच्या अंगावर घातला तर ते फाडून टाकीत. याबद्दल त्यांना विविध प्रकारे मारहाण करून झाली. तिचा उपयोग होत नाही म्हणून थंडीच्या

तुझे आहे तुजपाशी / १११