पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/111

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आरंभापासूनच आचार्यांच्या विषयीच्या थट्टेला या नाटकात आरंभ होतो, पण ही थट्टा आचार्यांच्या तोंडावर केली जात नाही. काकाजी आचार्यांच्या माघारी थट्टा करीत नसतात. ते प्रथमच विचारतात की आचार्य आणि गुरुजी असे डबल बॅरलवाले नाव हा माणूस काय म्हणून लावतो? पुढे एकदा ते विचारतात, हा माणूस भलताच लोकप्रिय दिसतो. याने सिनेमात वगैरे काम केलेले आहे काय? आणि या सुरात आचार्य काकाजींच्या तोंडून सारखे प्रेक्षकांच्यासमोर उभे केले जातात. तेव्हा जर कोणते या नाटकात उपहासविषय झाले असेल अगर होण्याची शक्यता असेल तर ते आचार्यांचे आहे, ही गोष्ट उघड आहे. पण प्रत्यक्ष नाटकात हा माणूस नाटकाच्या शेवटी सहानुभूतीचा व आदराचा असा विषय होतो. तो उपहासाचा आणि गमतीचा विषय राहत नाही.

आचार्यांचे व्यक्तिमत्त्व व चरित्र
  नाटकात आचार्यांच्या चरित्राचा जो उल्लेख आलेला आहे तो असा की तरुणपणीच अविवाहित राहून देशसेवा करण्याला या माणसाने स्वतःला वाहून घेतलेले आहे. ही देशसेवेविषयीची आचार्यांची निष्ठा कोणत्याही प्रकारे ढोंगी किंवा खोटी नाही. कारण देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात त्याने तुरुंगवास भोगलेला आहे. तारुण्यापासून म्हातारपणापर्यंत जेव्हा जेव्हा गरज पडली त्या वेळेला देशाच्या हाकेला ओ देऊन तुरुंगात जाण्याचे कार्य करताना हा माणूस कधी कमी पडला नाही. हा त्याग करीत असताना त्याने संधी साधून कधी पैसा मिळविण्याचा प्रयत्न केला नाही. किंवा चोरून, मारून भोगविलासही चालविलेला नाही. आचार्यांच्या चरित्र-चारित्र्याविषयी कोणत्याही प्रकारचा आक्षेप घ्यायला या नाटकात जागा नाही. अत्यंत कठोर, भोगरहित, व्रतबद्ध, असे जीवन सबंध आयुष्यभर या माणसाने व्यतीत केलेले आहे. कर्तव्याच्या बाबतीतसुद्धा त्याची निष्ठा तितकीच ज्वलज्जहाल आहे. आपला एक सहकारी मित्र तुरुंगात वारला, तर आचार्यांनी त्याची भावाप्रमाणे सगळी जबाबदारी स्वीकारली आहे. आपला सहकारी वारला, त्या दुःखाने सहकाऱ्याची पत्नी वारली तर ते लहान मूल आपले मूल म्हणून आचार्यांनी स्वीकारलेले आहे. एक चार-सहा महिन्यांचे मूल या अनिकेत फटिंग माणसाने सर्व प्रकारच्या खस्ता खाऊन लहानाचे मोठे केलेले आहे. या जातीचे व्यक्तिमत्त्व खेळकर

११० / रंगविमर्श