पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/110

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पण कुठेतरी आपल्या मनात गट आणि तटबंद्या बसलेल्या आहेत. ही शोकांतिका नाही, म्हणून सुखात्मिका आहे, विनोद भरपूर आहेत, प्रयोगात प्रेक्षक हसतात म्हणून ही खेळकर सुखात्मिका आहे असा एक साचा आपण मनाशी तयार करतो. त्या साच्यात हे नाटक नीट बसत नाही. कारण नाटक तिसऱ्या अंकात एकदम गंभीर पातळीवर जाऊ लागते. एका गंभीर वातावरणात या नाटकाचा थोडासा उदास करणारा असा शेवट होतो. खेळकर सुखात्मिका अशी नसते. या ठिकाणी समीक्षक आपली मोजपट्टी हुकली आहे, आपला साचा चुकला आहे हे लवकर मान्य करीत नाहीत. अहंता हा नाटकातल्या आचार्यांच्या ठिकाणी असलेला प्रबल विकार नसून तो समीक्षकांतही तितकाच प्रबल विकार आहे.

समीक्षकांची मोजपट्टी चुकीची
  आमचे समीक्षक आपली मोजपट्टी चुकली, आपण चुकीचा साचा गृहित धरतो आहो असे मानण्याऐवजी पु. लं. ची नाट्यरचनाच चुकली हे आग्रहाने सांगण्याचा प्रयत्न करतात. समीक्षेचा हेतू कलाकृती समजावून घेणे हा असतो; हे भान विसरले म्हणजे असे प्रकार घडतात. आमचे समीक्षक म्हणतात, हे नाटक शेवटाला गंभीर होते, सुखात्मिकेच्या प्रकृतीत सामावणारे हे गांभीर्य नाही. ह्यामुळे पातळीचा छेद होतो. नाटकातील सुसंगती बिघडते, नाटकाचा तोल जातो. त्यामुळे प्रायोगिक दृष्ट्या यशस्वी आणि कलात्मक व्यवहार म्हणून अंतर्गत विसंगतीमुळे तोल गेलेली संपूर्ण अयशस्वी आकृती निर्माण होते. एक चांगली सुखात्मिका कलात्मक यशाच्या जवळ जाताना मध्येच सपशेल घसरून अयशस्वी झाली आहे ही खेदाची गोष्ट म्हटली पाहिजे. कलाबाह्य जाणिवांना जैव्हा कलावंत शरण जातात तेव्हा असे अपयश निर्माण होते. या सगळ्याच मीमांसेत समीक्षकांच्या अहंतेच्या प्रदर्शनाशिवाय दुसरे काही दिसत नाही.
  म्हणून आपण ही खेळकर सुखात्मिका आहे काय याच प्रश्नाचा विचार केला पाहिजे आणि या प्रश्नाचा विचार या नाटकाविषयी आपल्या समजुती कोणत्या आहेत ह्याच्या आधारे न करता प्रत्यक्ष नाटकात काय लिहिलेले आहे हयाच्या आधारे केला पाहिजे. या नाटकात सर्वसामान्यतः जी व्यक्ती हास्यास्पद ठरली आहे असे आपण समजतो ती व्यक्ती म्हणजे आचार्य पोफळे गुरुजी.

तुझे आहे तुजपाशी / १०९