पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/109

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सुखात्मिका म्हणूनच पाहिलेले आहे. पूर्वी खाडिलकरांच्या 'मानापमान' नाटकाच्याकडे पाहतानासुद्धा समीक्षकांचा असाच घोटाळा झाला होता. गरीब विरुद्ध श्रीमंत हा संघर्ष मांडणारे हे एक गंभीर नाटक आहे असे गृहित धरून समीक्षक 'मानापमानाचे' विवेचन करू लागले आणि या चुकीच्या गृहित कृत्यामुळे सगळे विवेचन दोन बाजूंनी कोंडीत सापडल्यासारखे झाले. 'मानापमान' नाटकात श्रीमंत लक्ष्मीधर भेकड आणि मूर्ख दाखविलेला आहे. समाजातील श्रीमंत वर्ग हा निर्दय, उपद्व्यापी, बुद्धिमान आणि स्वार्थी असतो हे गृहित धरण्याऐवजी श्रीमंतांना मूर्ख भेकड समजणे रास्त आहे काय? आणि एखाद्या राज्याचा तरुण, देखणा, पराक्रमी सेनापती गरिबांचा प्रतिनिधी मानता येईल काय? ही दोन्ही टोके जर खाडिलकरांच्या मांडणीत हुकली असतील तर मग हे महान लोकप्रिय नाटक समजावून कसे घ्यावे ? समीक्षकांना या कोंडीतून लवकर बाहेर पडता आले नाही. 'मानापमान' हे गंभीर नाटक नव्हे, तो सुखद नाट्याभास आहे, ते एक स्वप्नांचे नवे जग आहे. या स्वप्नाळू जगातील एक संगीतप्रधान हलके-फुलके नाटक म्हणूनच 'मानापमान'कडे पाहिले पाहिजे. या बाबीकडे वा. ल. कुलकर्यांनी प्रथम लक्ष वेधले.
  पु. ल. देशपांडे यांचे 'तुझे आहे तुजपाशी' हे नाटक ही खेळकर सुखात्मिका नव्हे हे समजून घेण्याची आवश्यकता आहे. खेळकर सुखात्मिका म्हणून या नाटकाच्याकडे पाहताना दर वेळी समीक्षकांना ठेच लागलेली आहे. हे नाटक म्हणजे शोकांतिका नव्हे. तसा पु. ल. देशपांडे यांनी नाटकाच्या शेवटी उल्लेख केला असेल तर तो शोकांतिकेचा उल्लेख आहे. आचार्यांच्या तोंडी “अरे हीच तर दुःखांतिका आहे आमच्या आयुष्याची." असे वाक्य या नाटकात टाकलेले आहे. शेवटी काकाजीसुद्धा सांगतात, “न पेलणाऱ्या पट्टीत गाऊ नये बेटा, नाही तर आयुष्य बेसूर होऊन जाते.” या वाक्यांचा आधार घेऊन हे नाटक शोकांतिका आहे असे म्हणण्याचा मोह होऊ नये, कारण ती शोकांतिका नव्हे. शोकांतिकेसारखी या नाटकाची रचना नाही, पण ती शोकांतिका नाही म्हणून सुखात्मिका आहे आणि विनोद भरपूर आहे म्हणून खेळकर सुखात्मिका आहे. असा ग्रह करून घेण्याची गरज नाही.
  आपण मानवी जीवनाची विविधता सांगतो. कोणत्याही काटेकोर चौकटीत बंदिस्त न होणारे अनेकपदरी गुंतागुंतीचे वास्तव म्हणून जीवनाचे वर्णन करतो,

१०८ / रंगविमर्श