पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/108

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जीवनावर प्रभुत्व गाजविणारे एक दर्शन फक्त इतरांच्या दुःखावर उभे आहे, अशी काहीतरी आपली समजूत आहे. स्वतः पु. लं. ची ही समजूत होऊ शकत नव्हती. महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे, साने गुरुजी ही पु. लं. ची एकेकाळची श्रद्धा व आदराची स्थाने आहेत आणि बाबा आमटे हे आजचे आदराचे स्थान आहे. ऋषितुल्य जीवन जगणाऱ्या व्रतबद्ध गांधीवाद्यांच्या समोर कृतज्ञतेने नतमस्तक होण्यात पु. लं. ना कधी संकोच वाटला नाही. तेव्हा गांधीवादाविषयीची तुमची, आमची समजूत आणि पु. लं. ची समजूत एक आहे, अशी समजूत करून घेण्यात अर्थ नाही. अगदी पहिल्याच आवृत्तीत त्यांनी प्रस्तावनेत असा इशारा दिला आहे की 'विशेषतः आचार्यांची वेषभूषा आणि रंगभूषा करताना ही खबरदारी घेणे आवश्यक आहे. हे नाटक मी कोणाही एका व्यक्तीला डोळ्यासमोर ठेवून लिहिलेले नाही.' निदान पु. लं. ना निकट परिचयावरून हे माहीत होते की प्रत्यक्षात ते सांगतात तसा कुणीही मोठा गांधीवादी कार्यकर्ता नाही.
  ब्रह्मचारी राहणे ही काही गांधीवाद्यांची ठळक निशाणी नव्हे. स्वतः गांधीजी विवाहित होते. दादा धर्माधिकारी विवाहित आहेत. बाबा आमटे विवाहित आहेत. गांधीवाद्यांनी विवाह करणे वर्ण्य मानलेले नाही आणि राजकीय लढ्यात अविवाहित सगळेच गांधीवादी नाहीत. किंबहुना एखाद्या ध्येयवादासाठी अविवाहित राहणारे लोक राजकीय कार्यकर्ते असतील याचीही खात्री नाही. दत्तोपंत पोतदार, सोनोपंत दांडेकर या मंडळींना कुणी राजकीय कार्यकर्ते म्हणणार नाहीत. ज्याला हसणे, खेळणे, आनंद सहन होत नाही, असा माणूस गांधीवादी असतोच असा काही नियम नाही. पु. ल. देशपांडे यांनी या नाटकात गांधीवाद उपहास-विषय केला आहे किंवा कुणी मान्यवर गांधीवादी उपहास-विषय केला आहे हा मुद्दा नाटकातील पुराव्याच्या आधारे सिद्ध करता येणे कठीण आहे.

ही खेळकर सुखात्मिका नव्हे
  हे नाटक पाहताना येणारी दुसरी अडचण ही आहे की प्रेक्षक या नाटकाच्याकडे खेळकर सुखात्मिका म्हणून पाहण्याचा प्रयत्न करतात. प्रेक्षकांनाही हे जाणवते की हे काही तरी निराळे आहे, पण या निराळेपणाचे स्वरूप कसे सांगावे, कारण समीक्षकांनी एकजात या नाटकाच्याकडे खेळकर

तुझे आहे तुजपाशी / १०७