पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/107

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कळली तेव्हा स्वामीजी म्हणाले, “वरेरकरांनी जनतेची दिशाभूल होईल असे नाव द्यायला नको होते.” तेव्हा स्वामीजींच्या हे निदर्शनाला आणून द्यावे लागले की नाटक पाहणाऱ्या जनतेची कोणतीही दिशाभूल झालेली नाही. नाटक न पाहणाऱ्या व्यक्तीची अनुमाने चुकलेली आहेत.
  गांधीवाद्यांच्या अशा अनेक बाबी सांगता येतील. त्यांची राजकीय मतेसुद्धा काही आपल्याला पटतील, काही पटणार नाहीत, पण म्हणून सर्व गांधीवादी इतरांच्या छळात आनंद मानणारे आहेत असा भ्रम करून घेण्याचे कारण नाही. आपल्या डोक्यातील पहिला भ्रम हा आहे की गांधीवादी काव्याचे, सौंदर्याचे आणि सौजन्याचे शत्रू असतात. सर्व प्रसिद्ध गांधीवादी निसर्गसौंदर्याचे अत्यंत चाहते आहेत. आचार्य भागवत तर रवींद्रनाथ टागोर आणि खलील जिब्रान या महाकवींच्या काव्याचे फार मोठे चाहते आणि भाष्यकार होते. आणि सामान्यपणे गांधीवादी कार्यकर्ते व्रतबद्ध जीवन जगतात. त्यामुळे त्यांनी स्वतःवर बंधने लादून घेतलेली असतात, पण आपल्यापासून इतरांना उपसर्ग होऊ नये, झाली तर आपली इतरांना मदत व्हावी हे पाहण्यात ते दक्ष असतात. काही गांधीवादी तर असे आहेत की ते शेकडो कुटुंबांच्यामध्ये त्या घरातले एकच म्हणून होऊन गेलेले असतात. त्यांचे आगमन हा गृहिणीला माहेरचा वडीलधारा माणूस आल्यासारखा दिलासा असतो आणि मुलेबाळे त्यांच्याभोवती खेळत असतात. माझ्या पाहण्यात असे एक सर्वोदयवादी कार्यकर्ते आहेत की, त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या पत्नीचे पहिले मूल आणि दुसरे मूल यात वर्षाचेच अंतर आहे म्हणून संभाळण्यासाठी वडील मूलच स्वतःकडे ठेवून घेतले. तीन-चार वर्षे मोठ्या लाडात आनंदाने हे मूल वाढवले आणि आई-बापाला पाच वर्षांचे मूल झाल्यानंतर परत केले. या सर्वांची नावे मी सांगू शकेन.
  गांधीवाद्यांच्यामध्ये दांभिक सर्वोदयवादी नाहीत अशातला भाग नाही. कोणत्याही विचारसरणीत अशी दांभिक माणसे असतातच, पण हे मान्य गांधीवाद्यांचे चित्रण नव्हे. आपण गांधीवादी लोक कसे असतात याविषयी मनाशीच एक कल्पनाचित्र उभे केले आहे. या कल्पनाचित्रातील गांधीवादी प. लं.नी उपहास-विषय केला आहे अशी एक अजून चुकीची समजूत करून घेतली. इतरांच्या आनंदाचा नाश करणे ही गांधीवादी तत्त्वज्ञानाची एक महत्त्वाची भूमिका आहे अशी आपली समजूत झालेली दिसते. शेकडो- हजारो व्यक्तींच्या

१०६ / रंगविमर्श