पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/106

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

करीतही नाही, म्हणून सत्याग्रह करणाऱ्यांचा विजय होत नाही तशी फजिती होत नाही. आणि गांधीवाद हे ग्रामप्रधान अर्थरचनेचे तत्त्वज्ञान आहे. मोठ्या यंत्रांना सर्वोदयवाद्यांचा विरोध आहे. हाही मुद्दा या नाटकात उपस्थित होत नाही. सर्वोदय-दर्शनाचा एकही तात्त्विक मुद्दा या नाटकात उपस्थित झालेला नाही, परिहास-विषय झालेला नाही म्हणून मग गांधीवादाचे विडंबन म्हणून हे नाटक असफल झाले आहे असे म्हणावे काय?
  माझ्या वैयक्तिक जीवनाला काही निराळी पार्श्वभूमी असल्यामुळे गांधीवाद्यांचे जीवन मी जवळून पाहिलेले आहे. हैद्राबाद संस्थानचे प्रसिद्ध राजकीय नेते कै. स्वामी रामानंदतीर्थ यांच्याशी माझा चांगला परिचय होता. विनोबाजींचे शिष्य अच्युतभाई देशपांडे यांनाही मी ओळखतो. महाराष्ट्रात गांधीवादी म्हणून आचार्य विनोबा भावे, अप्पा पटवर्धन, अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे, पूज्य बाबा आमटे, दादा धर्माधिकारी, आचार्य भागवत, शंकरराव देव ही माणसे ओळखली जात. महाराष्ट्रीय असलेले, पण महाराष्ट्रात वास्तव्य नसलेले काका कालेलकर हेही प्रसिद्ध गांधीवादी आहेत. यातील प्रत्येक गांधीवाद्याची लकब आणि तहा निराळी आहे. त्यांच्यात गुणदोष नाहीत अशातला भाग नाही. उलट काही गांधीवादी नेत्यांच्या ठिकाणी एक चमत्कारिक असा भोळसरपणाही दिसतो.
  या भोळसरपणाची एक गमतीदार हकीकत सांगण्याजोगी आहे. आमच्या महाविद्यालयात मामा वरेरकरांचे 'हाच मुलाचा बाप' हे नाटक स्नेहसंमेलनानिमित्त बसविलेले होते. ही बातमी ज्या वेळी स्वामीजींना कळली त्या वेळी त्यांनी या घटनेविषयी तीव्र नापसंती व्यक्त केली. हा एक आमच्यासाठी गमतीचा विषय होता. स्वामीजींना हे नाटक मामा वरेरकरांचे आहे याचीही कल्पना नव्हती. या नाटकाचा विषय काय आहे हेही त्यांना माहीत नव्हते, पण त्यांनी अंदाज केला होता. त्यांच्या अंदाजानुसार एक मूल आहे आणि त्याचा बाप कोण याचा या नाटकात शोध चालू आहे. मुलाची आई निरनिराळ्या पुरुषांच्याकडे आपल्या मुलाचा हा बाप आहे म्हणून बोट दाखवते, लोक नाकारतात. शेवटी खरा बाप सापडतो. अशी नाटकाच्या कथानकाच्याविषयी स्वामीजींची कल्पना होती. प्रसिद्ध काँग्रेस कार्यकर्ते मामा वरेरकर यांचे हे हुंड्याच्या विरोधी नाटक आहे ही गोष्ट स्वामीजींना जेव्हा

तुझे आहे तुजपाशी / १०५