पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/105

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बोलण्यात या दोन बाबी असलेल्या आहेत. पहिली बाब म्हणजे हे नाटक ही एक खेळकर राखात्मिका आहे. दुसरी म्हणजे या नाटकात गांधीवादाची कुचेष्टा आणि टिंगल आहे. महाराष्ट्रातील अकर्त्या, बुद्धिवादी वर्गाला गांधीवाद ही नेहमीच गमतीची व चेष्टेची गोष्ट वाटली. त्यांनी आपल्या स्वतःच्या गटात पु. ल. देशपांड्यांचा समावेश करावा ही गोष्ट स्वाभाविक आहे. ५८ साली जेव्हा मी हे नाटक प्रथम पाहिले तेव्हा अजून संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात आलेला नव्हता. विशेष घटनांच्यामुळे माझ्याही मनात गांधीवाद्यांच्याविषयी तीव्र राग होता तेव्हा गांधीवादाची चेष्टा आपण तर पाहावीच, पण आपल्या काही गांधीवादी मित्रांनाही मुद्दाम हा विडंबनाचा प्रकार नेऊन दाखवावा असे ठरवून मी नाट्यप्रयोगाला गेलो होतो.
 नाटकाचा पहिला प्रयोग रंगदार होता. आम्हीही समरस होऊन नाटक पाहिले, पण त्यात गांधीवादाची चेष्टा कुठे आहे हे त्या वेळी माझ्या नीटसे लक्षात आले नाही. अजूनही पुष्कळदा जेव्हा आमचे मित्र या नाटकात . गांधीवादाचा उपहास आहे म्हणून सांगतात तेव्हा मी त्यांना हाच प्रश्न विचारीत असतो. या इतक्या दिवसांत कुणी जाणता माणूस मला या प्रश्नाचे उत्तर देणारा सापडला नाही. पण सर्वांना या नाटकात गाधीवादाचा परिहास जाणवतो, आपल्याला मात्र तो जाणवत नाही, याची कारणे शोधण्याचा मी नेहमीच प्रयत्न केला. एक तत्त्वज्ञान म्हणून सर्वोदय दर्शन हे मला मान्य नसले तरी त्या दर्शनाचे म्हणणे काय आहे इतकं मला माहीत आहेच. सर्वोदयाने उपस्थित केलेल्या तात्त्विक प्रश्नांची चेष्टा-कुचेष्टा मला या नाटकात कुठेच आठवली नाही.
  गांधीवाद्यांनी नेहमीच गांधीवाद हे माणसाचे आणि हे माणसांच्यासाठी असणारे असे तत्त्वज्ञान मानले. त्यामुळे या तत्त्वज्ञानात जनावरांच्या हृदयपरिवर्तनाचा प्रश्न कधी उपस्थित होत नाही. गांधीवाद्यांनी शत्रूवर प्रेम करा व आत्मक्लेशाने त्यांचे हृदयपरिवर्तन करा असे सांगितले हे खरे आहे आणि शत्रूचे हृदयपरिवर्तन करता येईल की नाही याविषयी अनेकांच्या मनात व माझ्याही मनात शंका आहेत, यात वाद नाही; पण सोबतच गांधीवाद ही अन्यायाविरुद्ध आत्मबलिदानपूर्वक उभे राहण्याची आणि प्रतिकाराची प्रतिक्रिया होती. ही अन्यायाच्याविरुद्ध सातत्याने करावयाचा प्रतिकार ही सत्याग्रहाची कल्पना आहे. या नाटकात सत्याग्रहाचा प्रश्नही येत नाही. कुणी सत्याग्रह

१०४/ रंगविमर्श