पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/104

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अर्धवट सोडून देण्यात आलेले आहे. त्याचाही शेवट काय होतो यात नाटककाराला रस नाही. प्रमुख प्रवृत्तींचे प्रतिनिधी म्हणून एकमेकांच्या विरोधात उभे राहिलेले काकाजी आणि आचार्य यांच्यात तरी कुणाच्या भूमिकेचा निर्णायक विजय होतो असे सांगण्यांस नाटकात जागा नाही. प्रेक्षकांना काहीही वाटो, प्रत्यक्षात आचार्यांनी जे सांगितले आहे ते हे की 'माझ्या जीवनाचा क्रम असाच चालणार आहे. कुणी ऐको अगर न ऐको मला एकट्याला असेच चालत गेले पाहिजे.' हे काही कुणाच्या निर्णायक पाडावाचे लक्षण म्हणता येणार नाही.

अर्धविरामावर थांबणारे कथानक
  पु. ल. देशपांडे एक प्रश्न आपल्यासमोर उभा करतात. त्यांच्या पद्धतीनुसार अनेक बाजूंनी हा प्रश्न ते आपल्याला दाखवतात आणि प्रश्नांचे निर्णायक उत्तर न देता आपला कल दाखवून ते थांबतात. कथानक तसेच अर्धवट एका अर्धविरामावर येऊन थांबते आणि समस्या आपली गुंतागुंत दाखवून थांबते यापलीकडे निर्णायक असे पु. ल. काहीच सांगत नाहीत. फक्त ते एका गांभीर्याच्या पातळीवर नेऊन प्रेक्षकांना अंतर्मुख होण्याची संधी तेवढी उपलब्ध करून देतात. हे स्वरूपच नव्या नाटकांचे आहे. जुन्या नाटकांचे नाही. आधुनिक काळात जुन्या धर्तीची नाटके खूपच लिहिली जातात. स्वतःला नवनाट्याचे पुरस्कर्ते मानणारे लोकही कुणाचे तरी मृत्यू घडवून आणून प्रश्नच सोडविता येतात काय याचा विचार सतत करताना दिसतात. मानवी जीवनातील समस्या व्यक्तींच्या जीवनात निर्माण होतात, पण त्या वैयक्तिक नसतात. समस्यांचे स्वरूप व्यापक असते. व्यक्तींच्या जीवनात कधी या समस्या सुटतात, कधी मृत्यू समस्यांच्यापासून त्या व्यक्तींची सुटका करतो. तरीही मानवी जीवनात या समस्या तशाच शिल्लक राहिलेल्या असतात. त्यांची सोपी उत्तरे हुडकण्यापेक्षा त्यांची गुंतागुंत समजून घेणे हे अधिक महत्त्वाचे काम असते. पु. लं.ना स्वतःचे कल आहेत, पण त्यांची निर्णायक उत्तरे नाहीत आणि अशा ठिकाणी निर्णायक उत्तरे नसतात ही गोष्ट समजावून घेणे हेच जास्त महत्त्वाचे असते. .

गांधीवादाचे विडंबन?
  'तुझे आहे तुजपाशी' या नाटकाचा पहिला प्रयोग मी पाहण्यास गेलो त्या वेळी मी दोन बाबी गृहित धरलेल्या होत्या. त्याहीनंतर अनेक वेळेला अनेकांच्या

तुझे आहे तुजपाशी / १०३