पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/103

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नाटकातील खेळकरपणा नीटसा समजू शकेल असे वाटत नाही.

रचनातंत्र
  रचनातंत्राच्या दृष्टीने पाहिले तर हे नाटक तीन अंकी नाटक आहे. अनेक प्रवेश असणारा एकेक अंक आणि असे पाच अंक हे या नाटकाचे स्वरूप नाही. आपल्याला पाचअंकी नाटक लिहायचे नाही, नव्या नाट्यतंत्राला अनुसरून आपल्याला तीन अंकी नाटक लिहायचे आहे असे काही नाटककार ठरवतात आणि त्यांना आपल्या नाट्यवस्तूची मांडणी तीन अंकांत करता येत नाही. मग ते फिरत्या रंगमंचाचा आश्रय घेऊन प्रत्येक अंकात दोन प्रवेश तरी टाकतात, नाही तर तिसऱ्या अंकाचे प्रवेश पहिला, प्रवेश दुसरा असे दोन भाग करतात. नाट्याच्या मांडणीच्या दृष्टीने पु. लं.ना असे काही करावे लागले नाही. त्यांनी सरळ एकप्रवेशी तीन अंक घेतलेले आहेत. या अंकांच्या मध्ये फारसे अंतरही नाही. पहिल्या अंकाच्या आरंभापासून शेवटच्या अंकाच्या समाप्तीपर्यंत असे सर्व मिळून कथानक एक महिन्याच्या आत आटोपणारे आहे आणि तीनही अंक एकाच ठिकाणी म्हणजे इंदूरच्या देवासकर वाड्याच्या दिवाणखान्यात घडणारे आहेत. फारशा घटना नाहीत. फारसे प्रसंग नाहीत. स्थळांच्यामध्ये बदल नाहीत असे हे तीन अंकी नाटक आहे. असल्या प्रकारची रचना असणाऱ्या नाटकांच्याकडे नवे नाटक म्हणून पाहणे आवश्यक आहे.
  हा प्रश्न केवळ नाटक पाचअंकी आहे की तीनअंकी आहे असा नाही. तीनअंकी नाटकसुद्धा घटनाप्रधान नाटक असू शकते. त्याही नाटकात अनपेक्षित योगायोग आणि कलाटण्यांना महत्त्व असू शकते. हा प्रश्न कथावस्तूंच्या नुसत्या मांडणीचा नसून या कथावस्तूच्या प्रकृतीचा आणि जातीचाही आहे. काही घडणे याला महत्त्व न देता जे वृत्तींचे संघर्ष निर्माण होतात त्यावर लक्ष केंद्रित करणारी नाटके नव्या नाट्यतंत्राला अधिक जवळची म्हटली पाहिजेत. मग या नाट्यतंत्राचे नाव कोणत्या पाश्चात्याच्या आधारे द्यायचे हा प्रश्न निराळा आहे आणि या नाटकात अतिशय दक्षतेने कोणताही शेवट घडलेला दाखविण्याचे नाटककाराने टाळलेले आहे. गीता आणि श्याम यांचे प्रेमप्रकरण नाटककार तसेच अर्ध्यावर सोडून देतो. या दोन प्रेमिकांच्या प्रेमाचा शेवट कसा होतो यात नाटककाराला रस नाही. डॉ. सतीश आणि उषा यांचेही प्रेमप्रकरण तसेच

१०२ / रंगविमर्श