पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/102

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

औदार्य आणि समंजसपणा
  पु. ल. देशपांडे हे महाराष्ट्रातले प्रसिद्ध विनोदी लेखक असले तरी ते लढाऊ लेखक नाहीत. आचार्य अत्रे हेही विनोदी लेखकच होते, पण आपली हत्यारे घेऊन जणू ते नेहमीच रणमैदानावर उभे होते. लढण्यासाठी कारणे असतील तर मग अत्रे धुमश्चक्रीच्या ऐन मध्यावर उभे असत आणि अशी कारणे नसली तरी त्यांना कारणे निर्माण करणे भाग असे. पु. लं. च्या विनोदाचे स्वरूप असे नाही. त्यांना काही चांगले दिसत नाही आणि ते उचलून धरावेसे वाटत नाही असायाचा अर्थ नव्हे. ते चांगल्याला उचलून धरतातच, जे वाईट दिसेल त्याचा निषेध करतातच, पण त्यांची भूमिका नेहमी समजून घेण्याची, समजावून देण्याची राहिली. औदार्य आणि समंजसपणा हा पु. लं.चा विनोदाचा भाग आहे. हीच एक विलक्षण बाब आहे. अशा पिंडांच्या कलावंतांना समोर उभे असणाऱ्या वर्तमानकालीन संघर्षापेक्षा मानवी जीवनातील चिरंतन संघर्ष अधिक महत्त्वाचे वाटावेत हेच जास्त स्वाभाविक आहे. पु. लं.च्या कलाकृतींचे स्वरूप जीवनवादी असले तरी ते अशा सार्वकालिक प्रश्नांचा विचार करणारे आहे. यामुळेच तापलेल्या वातावरणात 'तुझे आहे तुजपाशी'सारख्या नाटकाचा जन्म होऊ शकतो.
  या नाटकाचा पहिला प्रयोग पाहण्याचा योग मला इ.स. १९५८ साली आला. त्या वेळी नाटक पुरेसे लोकप्रिय होते. धमाल विनोदी आणि कमाल लोकप्रिय असे नाटक आपण पाहावयास जातो आहो असे गृहित धरूनच मी नाट्यप्रयोगास गेलो होतो आणि सर्वांच्याप्रमाणे हसतखिदळतच या नाटकाचा पहिला प्रयोग मी पाहिलेला आहे. हा प्रयोग पाहताना जे मला प्रथम जाणवलं नाही ते प्रयोग पाहून झाल्यानंतर जाणवलं. त्यानंतर एक-दोन वेळा या नाटकाचा प्रयोग पाहण्याचा मला योग आला त्या वेळी तर माझ्या मनाचा गोंधळ हा अधिकच वाढला. लिखित स्वरूपातील नाटक तर अनेक वेळेला मला वाचावे लागले आणि दर वेळी माझ्या हे लक्षात आले की आपण गुंतागुंतीचे एक नाटक पाहतो आहो. त्याची रचना जशी वाटते तशी सोपी नाही. या नाटकातील सोपेपणाच्यामागे एक गुंतागुंत आणि खेळकरपणाच्यामागे एक उदास गांभीर्य भरलेलं आहे. त्या गांभीर्याचा स्वीकार केल्याशिवाय या

तुझे आहे तुजपाशी / १०१