पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/101

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तप्त वातावरणात शीतल शिडकावा
  एका तप्त अशा वातावरणात या नाटकाचा प्रयोग झालेला आहे. मुंबई मराठी साहित्यसंघाने ५७ सालच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जेव्हा या नाटकाचा पहिला प्रयोग सादर केला. तेव्हा सर्व महाराष्ट्राचे वातावरण उग्र आणि संतप्त होते. मुंबईत तर संताप शिगेला पोहचल्यासारखा दिसत होता. हा संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाचा एक संतप्त काळ आहे. राज्य पनर्रचना मंडळाचा अहवाल प्रकाशित झाल्यापासून महाराष्ट्रातले वातावरण तापलेलेच होते. यातच मुंबईच्या बेछूट गोळीबाराचे प्रकरण घडून गेलेले होते. नवे द्वैभाषिक अस्तित्वात आणून यशवंतराव चव्हाणांच्या नेतृत्वाखाली नव्या निवडणुकीला काँग्रेस सिद्ध झालेली होती. शंकरराव देव आणि भाऊसाहेब हिरे यांच्या नेतृत्वाचा अस्त झालेला होता. ५७ च्या निवडणुका तीन आठवड्यांवर येऊन पोहचल्या होत्या. या निवडणुकांतच पश्चिम महाराष्ट्रात आणि मुंबईत काँग्रेसचे पानिपत झाले. या पार्श्वभूमीवर पु. लं. चे नाटक आपण पाहू लागलो तर भोवतालच्या प्रक्षुब्ध आणि संतप्त वातावरणाचा या नाटकावर काहीही परिणाम झालेला नाही असे दिसून येते.
  जीवनात चालू असणाऱ्या संघर्षाच्याविषयी पु. ल. देशपांडे हे जर उदासीन असते, त्यांनी जर जीवनातल्या संघर्षाकडे पाठ फिरवून अंतर्मनाचे कप्पे-चोरकप्पे उघडून पाहिले, यात रस घेतला असता आणि मग भोवतालच्या प्रश्नांना त्यांचे नाटक उदासीन राहिले असते तर मग त्या घटनेचा उलगडा करता येणे फार सोपे गेले असते. पु. ल. देशपांडे हे समीक्षक म्हणून प्रसिद्ध नसल्यामुळे त्यांच्या लिखाणातून त्यांची भूमिका कलावादी आहे की जीवनवादी आहे हे सांगणे सोपे काम नाही, पण असे समीक्षणात्मक लिखाण सोडून आपण सरळ त्यांच्या ललित वाङ्मयाकडे वळलो तर असे दिसते की, हे वाङ्मय आग्रही बोधवाद्यांचे, प्रचारवाद्यांचे वाङ्मय नाही, पण हे जीवनवाद्यांचे वाङ्मय आहे. 'तुझे आहे तुजपाशी' या नाटकातसुद्धा जो प्रश्न उपस्थित झालेला आहे तो जीवनमूल्याचाच प्रश्न आहे. आपल्या वाङ्मयकृतीत जीवनमूल्यांचे प्रश्न उपस्थित करणाऱ्या कलावंताने भोवतालच्या परिस्थितीविषयी उदासीन असावे हे थोडे चमत्कारिक दिसते, पण त्यात एक संगती आहे.

१०० / रंगविमर्श