पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/100

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्या साली संपले हे जरी खरे असले तरी त्यामुळे एकाएकी नवीन कार्यक्रमाला आरंभ होऊ शकत नाही. ४६, ४७ आणि ४८ ही तीन वर्षे अत्यंत अस्थिरतेची, उद्वेगाची आणि मनस्तापाची गेली. नाटकासारख्या सार्वजनिक कलेला हे वातावरण मोठे सोयीस्कर नव्हते. यानंतर पुन्हा एकदा नव्या जोमाने नाटक उभे करण्यास आरंभ झाला. हौशी मंडळींनीच या कामी पुढाकार घ्यावा हे स्वाभाविक होते कारण व्यावसायिक रंगभूमी थकलेलीच होती. या धडपडीत मुंबई मराठी साहित्य संघाचा वाटा फार मोठा आहे. त्या हौशी व्यासपीठावरूनच अनेक प्रयोग झाले. या प्रयोगांचे पु. ल. हेही भागीदार होते. 'तुझे आहे तुजपाशी' या नाटकाचा पहिला प्रयोग साहित्यसंघाने केला. मुंबई मराठी साहित्यसंघाने या नाटकाचा जेवढा देखणा प्रयोग सादर केला होता, तितका देखणा प्रयोग पुन्हा कधी कुणाला सादर करता आला नाही.

हौशी रंगभूमी
  हौशी रंगभूमीचे एक सामर्थ्य असते. कारण ही रंगभूमी नफ्या-तोट्याकडे दुर्लक्ष करून चिकाटीने प्रयत्न चालू ठेवू शकते. शिवाय हीच रंगभूमी निरनिराळे प्रयोगही करू शकते. पण हौशी रंगभूमीला एक मर्यादा असते. प्रेक्षकांच्या समोर तुम्ही जे प्रयोग सादर करणार, त्यांना जर व्यापक प्रतिसाद मिळत नसेल तर हौशी रंगभूमीला सुद्धा दहा-वीस प्रयोग करून त्या नाटकाचा निरोप घेणे भाग असते. ज्या वेळी हौशी रंगभूमीवर प्रचंड व्यावहारिक यश मिळविणारे नवे नाटक उदयाला येते, त्या वेळी हीच हौशी रंगभूमी व्यावसायिक रंगभूमीच्या पुनर्व्यवस्थापनाची वाट मोकळी करून देते. 'तुझे आहे तुजपाशी' या नाटकाच्यामुळे व त्याच्या प्रचंड लोकप्रियतेमुळे हा योग आला. नव्या व्यावसायिक रंगभूमीचा जन्म कुण्याही एका नाटकामुळे अगर एका नाटककारामुळे घडलेला आहे, असे मला म्हणावयाचे नाही. पण ज्या वेळी आपण नव्या व्यावसायिक रंगभूमीच्या जन्माला कारण ठरणारे घटक शोधू त्या वेळी नवे नाटक हा एक घटक असतो, असे आपल्याला मानावे लागते आणि अशा नाटकांची मोजदाद आपण करू लागलो तर त्यात या नाटकाचे स्थान अत्यंत गौरवाने घ्यावे लागेल. नाटकांच्याविना व्यावसायिक रंगभूमी उभी राहत नसते. अनेक अर्थांनी पु. लं. चे हे नाटक एक नवे नाटक आहे.

तुझे आहे तुजपाशी / ९९