पान:युरोपचा अर्वाचीन इतिहास - १४५३-१९२०.pdf/४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( २ ) होत गेली हैं समजून घेण्याची जिज्ञासा साहाजिकच वाढू लागली. ही जिज्ञासा थोडीतरी पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा या हेतूनें हें पुस्तक लिहिलें आहे. पंधराव्या शतकाच्या शेवटीं शेवटीं प्राचीन कलाविद्यांचें पुनरुज्जीवन झाल्यानें युरोपियन जनतेच्या आचारविचारांत, त्यांच्या सामाजिक, धार्मिक व राजकीय कल्पनांमध्यें मोठी खळबळ उडून धार्मिक प्रश्नासंबंधीं युरोपि- यन राष्ट्रांमध्ये दोन तट पडले व त्याचें पर्यवसान तीस वर्षे टिकलेल्या धर्मयुद्धांत होऊन या युद्धानंतर झालेल्या वेस्टफॅलियाच्या तहानें (१६४८) युरोपची नवी मांडणी करण्यांत आली. यानंतर सतराव्या व अठराव्या शतकांमध्ये युरोपमधील बहुतेक सर्व राष्ट्रांवर अनियंत्रित एकतंत्री राज्यपद्धतीचा पगडा बसून सरतेशेवटीं १७८९ मध्यें फ्रान्समध्ये झालेल्या राज्यक्रान्तीनें समता, विश्वबंधुत्व, स्वातंत्र्य या कल्पनांचा फैलाव होऊन राज्यकर्त्यांच्या प्रतिगामी, एकतंत्री, अनियंत्रित सत्तेविरुद्ध युरोपमधील बहुतेक सर्व राष्ट्रांत चळवळी झाल्या व सनदशीर राज्यपद्धति, एकराष्ट्रीयत्व या तत्त्वांचा विकास होऊन युरोपची नवी मांडणी करण्यांत आली. युरोपमध्ये अशाप्रकारच्या अंतस्थ घडामोडी सुरू असतां स्पेन, पोर्तुगाल, इंग्लंड, फ्रान्स, हॉलंड व अगदीं अलीकडे जर्मनी या राष्ट्रांमध्ये महासागरापलीकडे असलेल्या प्रदेशांवरील वर्चस्वासंबंधीं स्पर्धा उत्पन्न होऊन जगाच्या चार पंचमांश भागावर युरो- पियन राष्ट्रांचें वर्चस्व प्रस्थापित झालें. अशारीतीने गेल्या पांच शतकांमध्यें युरोपियन राष्ट्रांची कसकशी उत्क्रान्ति होत गेली, व गेल्या महायुद्धाच्या सुरुवातीस युरोपियन राष्ट्रांचे संबंध कशाप्रकारचे होते याविषयीं प्रस्तुत पुस्तकांत हकीकत आलेली आहे. प्रस्तुत पुस्तकास इंदूरच्या 'महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक मंडळा'नें उदारपणें चारशे रुपयांची मदत केली याबद्दल मी 'मंडळा' चा व होळकर सर- कारचा अत्यंत आभारी आहे. मंडळाकडून मदत मिळाली नसती तर पुस्तक प्रसिद्ध करणें शक्य झालें असतें कीं नाहीं याची शंकाच आहे.