पान:युगान्त (Yugant).pdf/१८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

युगान्त / १६७


त्रिखंडभरत चक्रवर्ती असत. रामाला बलदेव लक्ष्मण होता, प्रतिवासुदेव रावण होता. कृष्णाला बलदेव बलराम होता. प्रतिवासुदेव कंस होता. सात वासुदेव गौतमगोत्री, आठवा राम दाशरथी व नववा कृष्ण वासुदेव हे दोन्ही कच्छप गोत्री. सर्व वासुदेवांची स्वतःची अशी सात 'रत्ने असत. ती म्हणजे चक्र. खड्डू, धनू, मणी, माला, गदा, शंख. कृष्णालाही चक्र, खड्,कौमोदकी गदा, वैजयंती माला, स्यमंतक ( ? ) मणी, शार्ङ्गधनू होतेच. 'अभावो नत्थि वासुदेवाणम्' (‘वासुदेवांना कशाची कमतरता नसते.) हिंदूंच्या कल्पनेने वरील वाक्य घ्यावयाचे, म्हणजे वासुदेव हे पूर्ण सगुण-सर्वसंपन्न असे पुरुषोत्तम होते, असा अर्थ लावता येईल. आणखी दोन गोष्टी सांगितल्या आहेत. 'अवगुणं न गिण्हन्ति'. म्हणजे कितीही तुच्छ वा भयंकर गोष्ट असली, तरी तीत त्यांना काहीतरी चांगले सापडते. हा गुण 'अभावो नत्थि' याला पूरक समजला पाहिजे. ‘नीएण जुज्झेण न जुज्झंति' ('खाली उभे राहून लढत नाहीत.) हा त्यांच्या रथित्वाचा निदर्शक समजला पाहिजे.
 ह्या सर्व कल्पनेत काही सनातन कल्पना, काही बौद्ध संप्रदायाच्या कल्पना, काही ख्रिस्ती(?) कल्पना ओळखू येतात. सत्ययुगापासून कलीपर्यंत चतुष्पाद धर्माचा एक एक पाय तुटत होता, ही कल्पना अवसर्पिणी कालचक्रात येते. वासुदेव, प्रतिवासुदेव वगैरे एकेका कालखंडाचे प्रतिनिधी ही आपल्या मनूच्या कल्पनेप्रमाणे आहे. पूर्णपुरुष ही कल्पना - दशावतार ( नऊ वासुदेव ? ) ही कल्पना आपल्याकडे आहेच. वासुदेव-प्रतिवासुदेव ही कल्पना ख्रिस्त - प्रतिख्रिस्त (Christ-anti Christ ) यांसारखी वाटते. 'अवगुणं न गिण्हन्ति' ही कल्पना बौद्ध वाङ्मयात वारंवार येते. ह्या कल्पना कोठून आल्या वगैरेत शिरले, तर कृष्ण चरित्र बाजूलाच राहील. एवढे मात्र दिसते की, महाभारतात वासुदेवाचा व पुरुषोत्तमाचा उल्लेख अशा तऱ्हेने केला आहे की, ती एक कृष्णाची महत्त्वाकांक्षा होती असे समजते. वासुदेवाची चिन्हे होती असे