पान:युगान्त (Yugant).pdf/१८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६८ / युगान्त


समजते. पण या कल्पनेचा उलगडा काही नीट होत नाही. भारताचे वैचारिक धन, कथा, कल्पना, मूल्ये, तत्त्वज्ञान, धर्म ही सर्वच इतक्या निरनिराळ्या तऱ्हेने, निरनिराळ्या उगमातून आलेली आहेत की, त्यांचा अभ्यास केवळ तत्त्वशोधक दृष्टीने होणे जरूर आहे.
 महाभारतात जे काही अर्धवट उल्लेखिलेले व अतिशय कुतूहल जागृत करणारे विषय आहेत. त्यांमध्ये 'वासुदेव' हा एक आहे. त्या काळात तीन लोक बासुदेव होण्याची मनीषा बाळगून होते असे दिसते. एक वसुदेवाचा मुलगा वासुदेव कृष्ण; दुसरा शिशुपाल. ह्याला जन्मतःच चार हात होते. ह्यांतील दोन कृष्णाच्या दृष्टीपातानेच गळून पडले व त्यानंतर त्याने वासुदेव होण्याचा प्रयत्न केलेला दिसत नाही. पण त्याचे कृष्णाशी भयंकर वैर होते, असे दिसते. पूर्वेकडे(?) पौंड्र देशाचा राजा स्वतःला 'वासुदेव' म्हणवून घेई. कृष्ण स्वतः सांगतो की, 'हा पौंड्र माझी चिन्हे धारण करतो.' पौंड्रावर चाल करून कृष्णाने त्याला युद्धात मारले. त्याचे कारण तो स्वतःला 'वासुदेव' म्हणवून घेई हे ! 'वासुदेव' हे नाव प्राप्त करून घेणे म्हणजे काय होते, हे स्पष्ट कोठेही सांगितलेले नाही. पण वासुदेव म्हणवून घेण्याची धडपड पाहिली, म्हणजे त्यात काहीतरी विशेष होते, ह्याबद्दल शंका राहत नाही. कोठच्याही राज्याचा राजा नाही; सम्राट तर नाहीच नाही; पण वासुदेव असलेला असा कृष्ण होता. भगवद्गीतेत कृष्ण स्वतः म्हणतो, 'वृष्णीनां वासुदेवोऽहम्।' वसुदेवाला पुष्कळ बायका होत्या व त्यांना बलराम, सारण वगैरे मुलगेही होते. पण फक्त कृष्णच आपल्याला वासुदेव म्हणवून घेई, हे कसे ? प्रत्येक मुलाला आपल्या आईवरून नाव पडे. जसे रौहिणेय, कौंतेय, माद्रेय वगैरे. पण जरी निरनिराळ्या आयांचे मुलगे असले, तरी एका बापाचे असले म्हणजे सर्वांचे पैतृक नाव सारखे असावयाचे. उदाहरणार्थ, धर्म, भीम, अर्जुन हे कौंतेय होते व नकुल, सहदेव माद्रेय होते, व पाचही जण पांडूचे म्हणून पांडव होते. त्याप्रमाणे खरे पाहिले, तर वसुदेवाच्या