पान:युगान्त (Yugant).pdf/१८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६६ / युगान्त


 'वासुदेव' होणे हे प्रकरण काय आहे, ह्याचा नीटसा उलगडा होत नाही. पुराणातून कृष्ण - वासुदेव हा विष्णूचा अवतार होता व अवतारकार्य करून तो गेला, अशी कथा येते. तीच कथा सर्वांना माहीत असते. कृष्ण वासुदेव आपल्या स्वतःच्या आयुष्यभर देव म्हणून वावरला. त्याने देव म्हणून चमत्कार केले व तो आपल्या काळी देव मानला गेला, हेच आपण धरून चालतो. मागाहूनचे संस्कृत लिखाण हेच सांगते. मराठीत तर पांडवप्रताप, भक्तिविजय हे ग्रंथ, रुक्मिणी-स्वयंवर, सुभद्राहरण ह्यांची रसभरित आख्याने, त्यांवर आधारलेली नाटके ही तर कृष्णाबद्दल हीच भावना दृढ रुजवतात. महाभारत वाचताना त्यामुळे आश्चर्याचा धक्का बसतो. कृष्ण असामान्य मानव-पण मानवच असे महाभारतात चित्रण आले, त्याचे काही नवल वाटत नाही; पण 'वासुदेव' म्हणवून घेण्याचे त्याचे प्रयत्न, दुसऱ्या काही जणांचा तोच अट्टाहास, कृष्णाला आपले ‘वासुदेवत्व' टिकवण्यासाठी त्यांना मारावे लागणे, हे उल्लेख वाचून मन बुचकळ्यात पडते.
 महाभारतात ह्या प्रकरणाचा काही उलगडा होत नाही; जैन वाङ्मयात होतो. जैनांची 'वासुदेव' कल्पना पुढीलप्रमाणे आहे : जैनांनी कालचक्राचे चोवीस भाग कल्पिले आहेत. त्यांतील बारा भाग 'उत्सर्पिणी ( वर जाणाऱ्या) अवस्थेचे व बारा भाग ‘अवसर्पिणी' (खाली येणाऱ्या) अवस्थेचे धरतात. खालून वर येणाऱ्या अवस्थेत सर्व जीवमात्र जास्त जास्त चांगल्या मूल्यांकडे जात राहतात, तर अवसर्पिणीत त्यांची अधोगती होत राहते. ह्या कालचक्राच्या काही काही विभागात मिळून नऊ 'वासुदेव', 'बलदेव' व नऊ 'प्रतिवासुदेव' असे निर्माण झाले. अवसर्पिणीतच राम व कृष्ण असे दोन 'वासुदेव' झाले. सर्व नऊ वासुदेवांच्या आयांची व बापांची नावे दिलेली आहेत. रामाची आई केगमई व बाप दशरथ, कृष्णाची आई देवकी व बाप वसुदेव म्हणून कृष्ण (कण्ह) हा पैतृक अर्थाने 'वासुदेव' होता. 'वासुदेव' अखिल