पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रोग व्याधी बरे होतात. त्याच प्रमाणे अयोग्य आहार हा सर्व रोगांचे मूळ उगमस्थान आहे. पोट हेच व्याधी-विकाराचे अभयस्थान आहे. या पोटाचा गैर उपयोग कमी करायचा म्हणजे काय खायचे, किती खायचे, केंव्हा - कसे खायचे याचा प्रामुख्याने विचार करणे होय. आहारातील प्रथिनांचे (प्रोटीन्स) पचन सर्वात अगोदर होते, नंतर कर्बोदके (कार्बोहायड्रेस), त्यानंतर शेवटी मेदाचा (फॅटस्) नंबर लागतो. शरीराला हालचाल कमी असेल तर आहारातील प्रथिनांचेच फक्त पचन होते. पचन न झालेले खनिजे, मेद यांचा साठा शरीरात सुरू होतो. या साठ्यास 'आमवात' ही संज्ञा आहे. हा आमवात वाढीस लागतो. अन्नाचे पचन अर्धवट होते. अन्नरसाचा उपयोग रक्त, , मांस, मेद वाढविण्यासाठी होतो. पण अस्थी, मज्जा, शुक्र, ओज यांना मात्र अन्नऊर्जा मिळत नाही. ते उपाशीच राहतात. सप्तधातूंचे संतुलन बिघडते. आमवाताचे अनेक विकार सुरू होतात. आहारा संबंधीच्या खालील सर्वसाधारण सूचनांचे पालन केल्यास खाण्याच्या चांगल्या सवयी लागतील. अर्थात जुन्या सवयी लगेच जाणार नाहीत. त्यासाठी सातत्याने जाणिवपूर्वक प्रयत्न करावयास हवेत. आपल्या शरीराचे उष्णतामान साधारणपणे ९८ डिग्री फॅ. नेहमी असते. श्वसन प्रक्रिया व पचनक्रिया यातून ऊर्जा तयार होते. योग्य प्रकारच्या अन्नामुळे शरीराला ऊर्जा मिळते. या उर्जेतून दिवसभराच्या कार्याला गती मिळते. अन्नामुळे शरीराची झीज भरून निघते. शरीराची योग्य वाढ होते. शरीराला आलेला लठ्ठपणा किंवा वाढलेले अनावश्यक वजन यांचा संबंध व्यायामाचा अभाव, अयोग्य आहार, विरुद्ध अन्न याच्याशी आहे. शरीर प्रकृतीला न मानवणारे अन्न वारंवार खाल्यामुळे अपचन होते. त्यातून बद्धकोष्ट सुरू होते. या विकारातूनच अनेक रोग, व्याधी, व्यसने सुरू होतात. आपल्या आहाराचे दोन मुख्य घटक आहेत आम्लयुक्त अन्न व अल्कलीयुक्त अन्न. दोन्ही प्रकार एकत्र खाणे अयोग्य आहे. आरोग्याला घातक आहे. धान्यापासून तयार केलेले जेवणातील अन्न पदार्थ आम्लप्रधान आहेत. फळे व काही फळ भाज्या अल्कली युक्त आहेत. दोघांच्या पचन प्रक्रिया भिन्न आहेत. म्हणून जेवणापूर्वी किवा जेवणानंतर काही वेळाने फलाहार घ्यावा हे उत्तम. मेदवृद्धीतून मुक्ती ७४