पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

।। श्रीरामसमर्थ ।। १०. आसनातील ताण - दाब आसनातील ताण दाब कोणत्या प्रकारचा आहे? तो ताण किंवा दाब आपण योग्य पद्धतीने देतो आहे किंवा नाही ? तो योग्य प्रमाणात आहे कां? योग्य ठिकाणच्या भागाला तो मिळतो आहे का? ताण किंवा दाब दिलेला भाग सोडून इतर सर्व शरीर ताण विरहित आहे कां? दिलेला ताण / दाब संपूर्ण शरीरपेशींना सुखावणारा आहे कां? इत्यादी प्रश्नांची उत्तरे घेत स्नायुपेशी संभाळत, त्यांची परवानगी घेत प्रत्येक आसन करायचे आहे. योग्य पद्धतीने ताण-दाब दिल्यास तेथील स्नायुपेशी प्राणतत्त्वाने भारित होतात. त्या भागातील अवयव प्रभावी पद्धतीने कार्य करण्यास सुरूवात करतात. अयोग्य पद्धत किंवा चुकीचा ताण- दाब दिल्यास स्नायूंना त्रास होतो. दोन चार वेळा अशीच चूक झाल्यास स्नायूंचे दुखणे सुरू होते. सूर्यनमस्कार घालता येत नाहीत. साधना खंडित होते. हा ताण-दाब त्या आसनातील केंद्राला द्यायचा आहे. हे केंद्र आसनाचा आधार आहे. आसन स्थितीचा गुरूत्वमध्य आहे. आसनामधील सर्व स्नायुपेशींना सतत आणि सातत्याने ऊर्जा देणारे चक्र आहे. या ऊर्जाचक्राकडे पूर्णपणे लक्ष देत ताण किंवा दाब द्यायचा आहे. या मुख्य चक्रस्थानाकडून लक्ष विचलित झाले तर ताण-दाबाचे स्थान बदलते. अनपेक्षित ठिकाणी म्हणजेच चुकीच्या ठिकाणी ताण-दाब पडतो. हा ताण-दाब स्वीकारण्यास तेथील स्नायूंची तयारी नसते. अचानकपणे हा ताण-दाब पडल्यामुळे त्यांचा आरडा-ओरडा सुरू होतो. दिवसभर असह्य वेदना होतात. स्नायू असहकार पुकारतात. सूर्यनमस्कार घालण्यास परवानगी नाकारतात. आपली साधना खंडित होते. हा ताण दाब देतांना जसे ऊर्जाचक्राकडे लक्ष देणे महत्वाचे त्याचप्रमाणे श्वासप्रणालीकडे लक्ष देणे तेवढेच महत्त्वाचे आहे. आपल्या सर्व क्रिया - शारीरिक- मानसिक-प्रतिक्षिप्त-श्वासावर बेतलेल्या आहेत. कोणतेही कार्य करतांना श्वासोच्छवास योग्य पद्धतीने सुरू असतोच. सूर्यनमस्कार घालतांना ही मेदवृद्धीतून मुक्ती ६२