पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

।। श्रीरामसमर्थ ।। ६. शरीरातील ऊर्जाचक्र या संपूर्ण विश्वामध्ये असलेल्या प्रत्येक जीव-वस्तूला काहीतरी कारकत्व आहे. कारकत्व म्हणजे निर्मितीचे कारण, ते निर्माण करणारा आणि त्याची कृती (कार्य) या तिन्ही गोष्टी कारकत्व या शब्दातमध्ये अंतर्भूत आहेत. पंचमहाभूतांना सगुण रूप देणारा प्रत्यक्ष देव म्हणजे सूर्यनारायण. सूर्य हा पंचमहाभूतांचे कारकत्व आहे. पण या सूर्यदेवाचे कारकत्व असणारी शक्ती त्याच्याही पलीकडे असणार. त्या अदृष्य कारकत्वाचे सामर्थ्य अमर्यादित असणार. तो ईश्वराचाही ईश्वर म्हणजे परमेश्वर असणार. या परमतत्त्वाची, परमेश्वराची पूजा आपल्याला सूर्योपासना, सूर्यनमस्काराच्या माध्यमातून करायची आहे. कारण हा प्रत्यक्ष देव परमईश्वराचा प्रथम प्रतिनिधी आहे. समर्थ रामदास स्वामी या परम तत्वाला आत्माराम किंवा जगतज्योती या नावाने संबोधतात. विस्फारणे व पुन्हा मूळ स्थितीला येणे हे प्राणतत्वाचे वैशिष्ट्य. शरीरातील प्रत्येक पेशीचा आकार वाढणे कमी होणे, उभारून येणे खाली बसणे हे शरीरात सातत्याने सुरू असते. छातीची धडधड ऐकू येते, नाडीचे ठोके मोजता येतात. त्याचप्रमाणे संपूर्ण मासपेशींचे स्पंदने अखंडित सुरू असतात. या क्रियेचा मूळ गाभा प्रत्येक स्नायूपेशींमधील अवकाश पोकळी आहे. शरीरातील या अवकाशाचा संयोग बाहेरील अवकाशाशी झाला म्हणजे ही स्पंदने उत्पन्न होतात. घटाकाश व आकाश एकत्र आल्यावर शक्तीची निर्मिती होते. यालाच वैश्विक शक्ती किंवा प्राणतत्त्व म्हणतात. या स्पंदनाचे व्यक्त रुपास भौतिकशास्त्र चुंबकीय शक्ती किंवा विद्युतशक्ती या नावाने ओळखते. ही वैश्विक शक्ती किंवा प्राणतत्व हेच विश्वाच्या उत्पत्तीचे कारण आहे. हे शरीरात व वातावरणात सर्व ठिकाणी भरून उरलेले आहे. तेच अंतिम सत्य आहे. शाश्वत तत्त्व आहे. इतर सर्व मिथ्या आहे. कारण हे परम-तत्त्व सोडून इतर सर्व परिवर्तनशील आहे. मेदवृद्धीतून मुक्ती ३५